कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या वार्षीक सर्वसाधारण सभेतगोंधळ घातल्याच्या कारणावरुन शनिवारी महामंडळाचे माजी उपाध्यक्ष मिलिंद अष्टेकर यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. या शिवाय सभेत व्यासपीठावर येवून गोंधळ घातलेल्या सर्व सभासदांना कारणे दाखवा नोटिस बजावण्यात येणार आहे. पुण्यात झालेल्या संचालकांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.चित्रपट महामंडळाच्या राजकारणातून २०१४ साली अष्टेकर यांच्यावर अभिनेत्री छाया सांगावकर यांनी विनयभंगाचा आरोप केला होतो. काही दिवसांपूर्वी या प्रकरणाचा निकाल लागून अष्टेकर यांना निर्दोष मुक्त करण्यात आले. या निकालानंतर त्यांनी १५ डिसेंबर रोजी झालेल्या महामंडळाच्या वार्षीक सभेत छाया सांगावकर यांच्यासह अर्जून नलवडे व सुरेंद्र पन्हाळकर यांचे सभासदत्व करण्याची मागणी केली होती.
मिलिंद अष्टेकर यांना यापूर्वीही दोन प्रकरणांमध्ये नोटिस बजावण्यात आली होता. ५ लाख रुपये खर्चून वार्षीक सभा घेण्यात आली मात्र त्यांनी न्यायप्रविष्ट बाबीवरून घातलेल्या गोंधळामुळे सभा होवू शकली नाही. या प्रकारामुळे कोल्हापुरची मोठी बदनामी झाली आहे. त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी सर्व सभासदांची मागणी होती. वरील बाबींचा विचार करून सर्वानुमते हा निर्णय घेतला आहे.मेघराज भोसले, अध्यक्ष अ.भा. मराठी चित्रपट महामंडळ