कोल्हापूर : आपण बदलत नाही म्हणून वातावरण बदलत आहे. यापुढे पाणी आणि हवा हवी असेल तर आपल्याला पर्यावरणाला वाचवले पाहिजे तरच आपण टिकू शकतो. यासाठी रोज व्यायामही केला पाहिजे असे प्रतिपादन मॉडेल आणि अभिनेता मिलिंद सोमण यांनी बुधवारी व्यक्त केले.
प्रदूषणमुक्त पृथ्वी आणि निरोगी स्वस्थ जीवनासाठी प्रदुषण टाळा असा संदेश देत मिलींद सोमण हे सायकलवरून सुमारे पाचशे किलोमिटर प्रवास करून बुधवारी कोल्हापुरात सकाळी कोल्हापुरात आले. त्यांचे तावडे हॉटेल परिसरात सकाळी जंगी स्वागत करण्यात आले. यांनतर बँक ऑफ बडोदाच्या कोल्हापूर येथील विभागीय कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. बँकेचे क्षेत्रीय प्रमुख प्रशांत आव्हाड उपस्थित होते. सोमण म्हणाले, मनापासून लहानपणापासून मला शरीराला आव्हान देण्याची सवय आहे रोज पंधरा मिनिटे तरी धावतो. येणाऱ्या काळात पर्यावरणाचे प्रश्न आणखी गंभीर होतील. बदलते वातावरण, पर्यावरण, ग्लोबल वॉर्मिग, प्रदूषण आणि इतर समस्या आणखी जटील बनतील यासाठी स्वतःलाच बदललं पाहिजे. महागडा मोबाईल, महागडे कपडे, गाड्या अशा चैनीच्या वस्तू पाहिजेत, जीवनशैली बदलली पाहिजे, असे मत सोमण यांनी व्यक्त केले. रोज धावणे, पोहणे, सायकलिंग असे व्यायामाचे सर्व प्रकार कमीत कमी वेळेत का होईना, केले पाहिजे. स्वतःला सुदृढ ठेवले पाहिजे. यासाठी रोज जास्तीत जास्त वेळ व्यायाम केलाच पाहिजे याची आवश्यकता नाही, असेही ते म्हणाले. सोमण 'ग्रीन राईड २.०' सायकलवरून देशातील विविध राज्याचा रोज सरासरी दोनशे किलोमिटर प्रवास करत आहेत. आतापर्यंत १४०० किलोमीटर प्रवास त्यांनी केला आहे. कोल्हापूरातील वीस ते पंचवीस सायकलस्वार सोमण याच्यासोबत या रॅलीत सहभागी झाले. दरम्यान, सोमण यांनी बँक ऑफ बडोदाच्या मध्यवर्ती बसस्थानक परीसरातील जेमस्टोन बिल्डींगमधील क्षेत्रीय कार्यालयाला भेट दिली. यावेळी सोमण यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांशी संवाद साधला.
यानंतर ते बंगळूरूला रवाना झाले. त्यानंतर ते म्हैसूर आणि मंगलोरला भेट देणार आहेत. यावेळी बँकेचे क्षेत्रीय विकास प्रबंधक मोहसीन शेख, उपक्षेत्रीय प्रमुख देवीदास पालवे, शिवाजी चौक शाखाप्रबंधक सचिन देशमुख, सानिया कुलकर्णी उपस्थित होते.
लाइफलाँग फ्रीराइड सायकलवरून 'ग्रीन राइड'सुपरमॉडेल आणि फिटनेस आयकॉन मिलिंद सोमण १९ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधीत लाइफलाँग फ्रीराइड सायकलसह मुंबई ते मंगलोर ही ग्रीन राईड ८ दिवसात १० शहरांमध्ये १४०० किलोमीटर अंतर पूर्ण करणार आहेत. ही मोहिमेची दुसरी आवृत्ती आहे.त्यांच्याकडे लाइफलाँग फ्रीराइड सायकल ही शिमॅनो २१ स्पीड गियरची सायकल आहे. तिच्या वैशिष्ट्यांमध्ये डिस्क ब्रेक्स आहेत. शिवाय ब्रेकिंग सिस्टमसाठी उत्कृष्ट ब्रेकिंग पॉवर यांचा समावेश आहे. सर्व भूप्रदेशांवर योग्य ब्रेकिंग नियंत्रण हे सायकल विशेषतः डिझाइन केलेली आहे, अशी माहिती लाइफलाँग ऑनलाइन रिटेल प्रा. लि.चे सह-संस्थापक भरत कालिया यांनी सांगितले.