लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : दूध बिलाचे पैसे उत्पादकाच्या सेव्हिंग खात्यावर जमा करणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक गावांत बँकेची शाखा नसल्याने उत्पादकांना त्रास होतो, यासाठी जिल्हा बँकेच्या शाखा नसलेल्या ठिकाणी मायक्रो एटीएमच्या माध्यमातून दूध संस्थांच्या कार्यालयातच उत्पादकांना बिले देणार असल्याची माहिती बँकेचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी दिली.
जिल्हा बँक व गोकुळ दूध संघांच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बँकेत बैठक झाली. आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाच्या माध्यमातून जिल्हा बँक दूध उत्पादकांना ५०० कोटी कर्ज वाटप करण्याची घोषणा ग्रामविकास मंत्री व बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ यांनी केली होती. याबाबत बँक व संघाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. यामध्ये महामंडळाकडून कर्ज प्रकरणाची प्रक्रिया, व्यक्तिगत कर्जपुरवठा, दूध बिल वितरण, आदी विषयांवर चर्चा झाली. ‘गोकुळ’चे संचालक नविद मुश्रीफ यांचा सत्कार बँकेच्या वतीने करण्यात आला. संघाचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, बी. आर. पाटील, शरद तुरंबेकर, प्रशासन विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे, शेती कर्ज विभागाचे व्यवस्थापक पांडुरंग रावण, अकाउंट विभागाचे व्यवस्थापक विकास जगताप, दिलीप ढोबळे, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : दूध उत्पादकांना आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या वतीने देण्यात येणाऱ्या कर्ज योजनेबाबत जिल्हा बँक व गोकुळ दूध संघाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी बँकेत बैठक झाली. यावेळी नविद मुश्रीफ, डॉ. ए. बी. माने, आदी उपस्थित होते. (फोटो-३००६२०२१-कोल-जिल्हा बँक)