पाणीदार जिल्हा म्हणून कोल्हापूरची ओळख संपूर्ण देशात आहे. त्यामुळे जिल्ह्यात ऊस हेच प्रमुख पीक झाले, नगदी पीक म्हणून उसाचे क्षेत्र वाढत गेले; पण शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दुधाने शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थाने स्थैर्य आणले. दुधामुळेच शेतकऱ्याची बाजारात पत निर्माण झाली, दूध व्यवसायाने शेतकऱ्यांना बळकटी कशी दिली, याविषयी..राजाराम लोंढेकोल्हापूर : शेतीला जोडव्यवसाय म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसायाने शेतीला मागे टाकण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्याचे ऊस उत्पादन वर्षाला १.४० कोटी टन असून, त्यातून सरासरी सव्वावर्षाने ३९१५ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या पदरात पडतात. मात्र, संघाकडून मिळणारे रोजचा दूध दर, दिवाळीचा दूध फरक, संस्थांकडून मिळणारा रिबेट या माध्यमातून वर्षाला तब्बल ३२७१ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या हातात येतात. विशेेष म्हणजे दुधामुळेच बाजारात शेतकऱ्यांची पत निर्माण झाली आहे.राजर्षी शाहू महाराजांच्या दूरदृष्टीमुळे कोल्हापूर जिल्हा सुजलाम् सुफलाम् झाला. जशी साखर कारखान्यांची संख्या वाढत गेली, तसे उसाचे उत्पादन वाढले. महाराष्ट्रात चांगल्या रिकव्हरीचे ऊस उत्पादन कोल्हापुरातच होते. याला येथील कसदार जमीन, पाणी व मेहनती शेतकरी कारणीभूत आहे. इतर पिके कमी होत जाऊन ऊस पिकाकडे शेतकरी वळला. त्यामुळेच एकूण पेरक्षेत्रापैकी १.८६ लाख हेक्टर उसाचे क्षेत्र आहे.
ऊस हे नगदी पीक असले तरी त्याच्यासाठी करावी लागणारी गुंतवणूक, साखर कारखान्यांकडून ऊस तोड होऊन बिले जमा होण्यास सव्वा ते दीड वर्षाचा लागणारा कालावधी व एकूण उत्पादन खर्च वजा जाता, हातात मिळणारे पैसे याचा ताळमेळच बसत नाही. त्यामुळे शेतीला भाजीपाला व दूध व्यवसाय जोडधंदा म्हणून पुढे आला. अस्थिर बाजारभाव व लहरी निसर्गामुळे भाजीपाला अडचणीत आला. त्यामुळे अल्पभूधारक शेतकऱ्यांनी त्याकडेही पाठ फिरवत दूध व्यवसायाकडे वळले. शेतीला जोडधंदा म्हणून उदयास आलेल्या दूध व्यवसाय गेल्या पाच-दहा वर्षांत प्रमुख व्यवसाय बनला आहे. ऊस व दूध उत्पादन, त्यातून शेतकऱ्यांना मिळणारे पैसे पाहिले तर उसाला दुधाने मागे टाकण्यास सुरुवात केली आहे. एकूणच दुधामुळेच ग्रामीण भागाचा आर्थिक स्तर सुधारला आहे.
लागणीपासून तोडणीपर्यंत पैसे पेरावे लागतातउसाची लागण करण्यापासून त्याची तोड करेपर्यंत शेतकऱ्याला पैसे पेरावे लागतात. मशागत, बियाणे खरेदी, लागण, पाणी बिल, भांगलण, कीटक व तण नाशके, ऊस तोडीसाठी झट्याझोंब्या, तोडणीसाठी पैसे हे सगळे केल्यानंतर कारखाना महिना-दीड महिन्याने पैसे जमा करणार. यामुळे शेतकऱ्याचे उसावरील अर्थकारण विस्कटले आहे.
ऊस शेती न परवडण्यामागील कारणे :
- सततच्या पिकांमुळे जमिनीची उत्पादकता घटली आहे.
- पिकाऊ क्षेत्र तेवढेच; पण कुटुंब विभागल्याने जमिनीचे तुकडे पडले
- रासायनिक खतांच्या दरात झालेली भरमसाठ वाढ
- मशागत, शेती पंपाच्या विजेच्या दरात झालेली वाढ
- मजुरांची वानवा
- उसाचे कांडे जमिनीत लावल्यानंतर सव्वा ते दीड वर्षाने पैसे हातात