कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाने अकोला (ता. सांगोला) येथील आदर्श महिला दूध संस्थेत क्लस्टर बल्क कुलरद्वारे दूध संकलनास संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते सुरुवात करण्यात आली. अध्यक्षस्थानी शेतकरी सूतगिरणी, सांगोलाचे अध्यक्ष नानासाहेब लिगाडे होते.
लिगाडे म्हणाले, ‘गोकुळ’ने आपल्या गुणवत्तेच्या बळावर संपूर्ण राज्यात नाव केले असून येथेही १५ हजार लिटर संकलन होईल. त्यामुळे येथील दूध उत्पादकांना त्याचा फायदा होणार असून अशा प्रकारचे बल्क कुलर्स तालुक्यात इतर ठिकाणी सुरु करू.
‘गोकुळ’चे अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, ‘गोकुळ’च्या दूध व दुग्धजन्य पदार्थांना मुंबई, पुण्यासह राज्यात मागणी वाढत आहे. त्यामुळे संघाने केवळ कोल्हापूर जिल्ह्यातपुरते मर्यादित न राहता, इतर जिल्ह्यांतही दूध संकलन सुरू केले आहे. नजीकच्या काळात महाराष्ट्राच्या उर्वरित भागासह इतर राज्यांतही दूध विक्री सुरू केली जाईल. त्याचबरोबर दूध संकलनाचा २० लाखांचा टप्पा निश्चित पार केला जाईल. संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, प्रकाश पाटील, विठ्ल शिंदे, अशोक शिंदे, जगन्नाथ शिंदे, कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर, आदर्श दूध संस्थेच्या अध्यक्षा राणी चौगुले, संभाजी चौगुले आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : ‘गोकुळ’ने अकोला (ता. सांगोला) येथील आदर्श महिला दूध संस्थेत क्लस्टर बल्क कुलरद्वारे दूध संकलनास संघाचे अध्यक्ष विश्वास पाटील यांच्या हस्ते सुरुवात केली. यावेळी नानासाहेब लिगाडे, आदी उपस्थित होते. (फोटो-१००८२०२१-कोल-गोकुळ)