कोल्हापूर : जिल्ह्यात उद्या, शनिवारी मध्यरात्रीपासून सुरू होणाऱ्या आठ दिवसांच्या कडक लॉकडाऊनअंतर्गत सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते ७ या वेळेत फक्त दूध, भाजीपाला व गॅसची घरपोच सेवा व विक्रीला परवानगी असेल. रस्त्यावर येण्यास नागरिकांना पूर्णत: मनाई असून केवळ औषध दुकाने सुरू राहतील, तर पेट्रोल, डिझेल अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठीच देण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुुरुवारी सायंकाळी ही नियमावली जाहीर केली.जिल्ह्यात गेल्या महिन्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्याने बुधवारी पालकमंत्री सतेज पाटील, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हा पोलीस प्रशासन व महापालिकेच्या संयुक्त बैठकीत, उद्या, शनिवारी मध्यरात्रीपासून आठ दिवस कडक लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. त्याची सविस्तर नियमावली जिल्हा प्रशासनाने गुरुवारी जाहीर केली.यानुसार जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळता अन्य सर्व उद्योग, व्यापारी व इतर आस्थापना, कार्यालये व सेवा पुरवणारे घटक बंद ठेवण्यात येणार आहेत. या कालावधीत नागरिकांना घराबाहेर येण्यास व रस्त्यावर फिरण्यास सक्त मनाई असेल. दूध, भाजीपाला व गॅस या जीवनावश्यक वस्तूंचे सकाळी ६ ते १० व दुपारी ४ ते ७ या वेळेत घरपोच वितरण करण्यात येईल. कड़क लॉकडाऊनच्या अंमलबजावणीसाठी पोलीस प्रशासनदेखील सज्ज असून नियोजनाची बैठक आज, शुक्रवारी होणार आहे.हे राहणार सुरू -
- वृत्तपत्र वितरण, एटीएम, पोस्ट कार्यालये
- दोन टप्प्यात दूध, भाजी, गॅसची घरपोच विक्री व वाहतूक
- वैद्यकीय सुविधा, आवश्यक सर्व उत्पादन, विक्री, वितरण, औषध निर्मिती व त्यासाठी कच्चा माल पुरवठा करणारे उद्योग
- ऑक्सिजन उत्पादन व पुरवठा
- शेतीशी निगडित व मान्सूनपूर्व कामे
- डिझेल, पेट्रोल केवळ अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी
- शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेची व आरोग्य सेवेतील कार्यालये १५ टक्के उपस्थितीसह. न्यायालयीन कामकाज
- इंटरनेट यंत्रणा, दूरध्वनी, मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांची कार्यालये
- सर्व प्रकारची मालवाहतूक
लॉकडाऊनचा कालावधीउद्या, शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून रविवारी (दि. २३) रात्री १२ वाजेपर्यंत.राज्य शासनाचीही नियमावली जाहीरराज्य शासनानेदेखील लॉकडाऊनचा कालावधी १ जूनपर्यंत वाढवला असून सध्या सुरू असलेले निर्बंध कायम राहतील. याअंतर्गत अन्य तसेच बाधित राज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्या नागरिकांसाठी ४८ तासाच्या आधी केलेल्या आरटीपीसीआर निगेटिव्ह चाचणीचा अहवाल बंधनकारक असेल. हा अहवाल ७ दिवसांपर्यंत ग्राह्य धरला जाईल.