एकनाथ पाटील--कोल्हापूर --जिल्हाभर मटका व्यवसायाचे जाळे पसरले असून मटका व जुगाराच्या बुकिंगसाठी कोटींच्या ठेवी ठेवल्या आहेत. प्रत्येकी तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत ठेवी असणाऱ्या ३०० व्यक्तींचा तसेच व्यापारी, सरकारी नोकरांचा यामध्ये समावेश आहे. जिल्ह्यातील माजी आमदारांसह, आजी-माजी नगरसेवक, पंचायत समितीचे पदाधिकारी हे या मटक्याचे बुकी मालक असून, पोलिसच त्यांना कारवाईच्या आड ठेवत आहेत. या बुकीमालकांनी सुमारे दीडशे एजंटांचे जाळे जिल्ह्यात पसरविले आहे. विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी पडद्यामागील या राजकीय धेंडांच्या मुसक्या आवळल्या तरच मटका-जुगार पूर्णत: बंद होईल. कोल्हापूर जिल्ह्यात मटका व जुगारातून होणारी उलाढाल कोटींच्या घरात आहे. बुकमालकांची पोलिस ठाण्यात नेहमी ऊठ-बस असते. ते महिन्याला हप्ता देत असल्याने पोलिसही त्यांच्यासमोर मान झुकवितात. जिल्ह्यात सुमारे ३०० व्यक्तींनी मटका बुकींसाठी ठेवी ठेवल्या आहेत. प्रत्येकी ३ ते ५ लाख रुपये ‘डिपॉझिट’ म्हणून बुकीमालकांकडे त्यांची नोंद आहे. प्रत्येक दिवशी डिपॉझिट ठेवलेले लोक मोबाईलवरून मटका लावतात. यावेळी त्यांच्या डिपॉझिटमधून बुकीचालक पैसे वसूल करीत असतो. मटक्याच्या आहारी गेलेल्या काही व्यक्तींनी तर सोन्याच्या अंगठ्या, चेन, आलिशान गाड्या गहाण ठेवल्या आहेत. तरुण पिढीही यात भरडली गेली आहे. (उत्तरार्ध) वसुली हीच ड्यूटी!स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेसह जुना राजवाडा, लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, राजारामपुरी व करवीर पोलिस ठाण्यांत ‘कलेक्टर’ कार्यरत आहेत. त्यांना कुठली ड्यूटी किंवा जबाबदारी नाही. त्यांनी फक्त ‘वसुली’ करायची हीच त्यांची ड्यूटी! साहेबांची मर्जी सांभाळत ते मटका, क्लबवाल्यांकडून महिन्याला २५ ते ५० हजार रुपयांपर्यंत हप्ते गोळा करीत आहेत.५पोलिस रेकॉर्डवरील बुकी चालकविजय पाटील (रा. कांडगाव, ता. करवीर), माजी नगरसेवक बशीर पटेकर (सोमवार पेठ), नगरसेवक संजय तेलनाडे (इचलकरंजी), शरद कोराणे, आझम इब्राहिम शिकलगार (बिंदू चौक), संभाजी जोतिबा भोसले (ढेंगेवाडी, ता. भुदरगड), रमेश आनंदा माने (सोमवार पेठ, ता. भुदरगड), कादीर आदम शेख (सोमवार पेठ), शंकर पोवार (इचलकरंजी), पुंडलिक कृष्णा परीट (मुरगूड, ता. कागल), विशाल विजय मिरजकर (मंगळवार पेठ), रियाज बाबासो इनामदार (आझाद गल्ली), अशोक रामचंद्र राभाडे (आझाद गल्ली), नितीन दत्तात्रय भाट (रा. फुलेवाडी), अजित बागल, अमोल अशोक कांबळे, महंमद अल्लाबक्ष जमादार (रा. राजेंद्रनगर), रमेश बाबूराव नार्वेकर (रंकाळा टॉवर), गणेश माळी, पिंटू माळी, सुनील नागेश भुत्ते (म्हाडा कॉलनी), बबन लाला कवाळे (राजारामपुरी), संजय आप्पासो सोनवणे (रा. रविवार पेठ), संजय देसाई (कसबा बावडा), सुनील गवळी (शनिवार पेठ), नीळकंठ उर्फ राजेंद्र बाबूराव पोवार (सदर बझार), संजय काशीद (रा. गंगावेश), मनीष अग्रवाल, राकेश अग्रवाल, वैजनाथ पाटील, आसिफ मुल्ला, सुनील पवार, सुदर्शन बाबर, प्रकाश ढेरे, सुनील गायकवाड, शीतल हजारे, संतोष कुपटे, बाळू कोरवी (सर्व इचलकरंजी). पैसा शोध पथक गुन्हे शाखेच्या (डीबी) पथकात नियुक्ती हवी असेल तर पैसा मिळवून देण्याची हमी देणाऱ्या पोलिसाचीच या ठिकाणी वर्णी लागते. गुन्हे शोध हे फक्त नाव आहे. ‘पैसा शोध पथक’ म्हणूनच या विभागाकडे पाहिले जाते. पोलिस रेकॉर्डवरील आरोपींना पकडण्यापलीकडे कोणताही आव्हानात्मक गुन्हा त्यांच्याकडून उघडकीस आलेला नाही. या विभागातील कर्मचारी हद्दीतील राजकीय गुन्हेगारांच्या अवतीभोवती मिरविणे, चौकातील पानटपरीवर फुकटचे पान खाणे, ठरलेल्या लॉज-हॉटेलमध्ये दोन-दोन तास विश्रांती अशा पद्धतीचे उपद्व्याप करण्यामध्येच माहीर आहेत.
मटका खेळण्यासाठी लाखोंचे ‘डिपॉझिट’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2017 12:51 AM