पट्टणकोडोली : महाराष्ट्रातील सर्वांत मोठा घोंगडी विक्री बाजार पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील श्री विठ्ठल-बिरदेव यात्रेत बहरला आहे. यात्रेचे खास आकर्षण असणाऱ्या या घोंगडी बाजारातून यात्रेकरू आवर्जून घोंगडी खरेदी करतात. घोंगड्याची किंमत अगदी पाचशे रुपयांपासून पाच हजार रुपयांपर्यंत असते. यात्रा काळात या घोंगडी विक्री बाजारातून ५० ते ६० लाख रुपयांची उलाढाल दरवर्षी होते. पट्टणकोडोली येथील श्री विठ्ठल बिरदेव यात्रेत मोठा घोंगडी विक्री बाजार भरतो. या बाजारात अनेक भागातून घोंगडी विक्री करणारे व्यापारी येतात. यामध्ये विशेषत: संकेश्वर, कागल, वडगाव, कापशी व मुरगूडचे व्यापारी मोठ्या प्रमाणात येतात. थंडीच्या दिवसात उबदारपणा देणाऱ्या कपड्यांमध्ये घोंगड्याचा समावेश होतो, तर धार्मिक कारणही घोंगड्याला आहे. देवाच्या खांद्यावर असणाऱ्या कांबळ्यामुळे या घोंगड्याला धनगर बांधवांमध्ये एक विशिष्ट महत्त्वही प्राप्त झाले आहे. यात्रा काळात भरणाऱ्या या घोंगडी विक्री बाजारात यात्रेकरू मोठ्या संख्येने घोंगडी खरेदी करतात. त्यामुळे येथे असणारा घोंगडी विक्री बाजार हा यात्रेच्या आकर्षणाचा विषय बनला आहे. होतो. हा बाजार दीपावलीपर्यंत चालू असतो. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गोवा या राज्यातील भाविक यात्रेसाठी येतात व यात्रा पार पडल्यानंतर या घोंगडी बाजारातील घोंगडी आवर्जून खरेदी करतात. पट्टणकोडोली येथील यात्रा आटोपल्यानंतर घोंगडी विक्रेते पुढील बाजारासाठी जातात. पंढरपूर, चिंचणी, हुलजंती (सोलापूर), कर्नाटकातील आरेकरी या गावांमध्ये घोंगडी बाजार भरतो. विठ्ठल-बिरदेव यात्रा : सर्वांत मोठा बाजारघोंगडी बाजारामध्ये कोकप्नूर, तुंग संकेश्वरी, कुदरगी बुद्याळ, चळकेरी, मडेलरी वाणके, नातपोत, जमखंडी, अथणी मुरगुंडी आदी घोंगड्यांचे प्रकार उपलब्ध असतात. घोंगड्यांना गावाच्या नावातूनच ओळखले जाते. काळ्या व पांढऱ्या घोंगड्यांवर आकर्षक रंगीत सुबक नक्षीकाम केलेले असते. या घोंगड्याची किंमत ५०० रु. पर्यंत असते. यामध्ये आॅस्ट्रेलियन मेरिनावुलन या प्रकारचे घोंगडे सर्वांत महागडे असते, तर बाळलोकरी पासून बनलेलं देवाच कांबळही चार हजार रुपयांपर्यंत याठिकाणी मिळते.याबरोबरच जान ही बाजारात विक्रीसाठी ठेवलेले असतात. लोकरीच्या घोटणीपासून बनवलेले जान सहाशे ते आठशे रुपयांपर्यंत विक्री केले जाते. या बाजारात जवळपास १५ ते २० घोंगड्यांची दुकाने असतात.
पट्टणकोडोलीच्या घोंगडी बाजारात लाखोंची उड्डाणे
By admin | Published: November 04, 2015 10:06 PM