कोपार्डे: शहराला पाणीपुरवठ्यासाठी महत्त्वाचा असणाऱ्या शिंगणापूर बंधाऱ्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाया जात आहे. शिंगणापूर बंधाऱ्याची पाणी पातळी कायम राखण्यासाठी धरणातून सातत्याने पाणी सोडावे लागत असल्याने पाटबंधारे विभागावर पाणी नियोजनाचा ताण पडत आहे.
कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी काळम्मावाडी धरणातून पाणी दिले जात आहे. या धरणातील ७६.६५ द.ल.घ.मी पाणीसाठा कोल्हापूरसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. काळम्मावाडी धरणाच्या डाव्या कालव्यातून भोगावती नदीत पाणी सोडले जाते. हे पाणी शिंंगणापूरजवळील महापालिकेच्या मालकीच्या बंधाऱ्यात अडवून शहराला पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येते. मात्र, शिंगणापूर बंधाऱ्याचे उजवीकडून ४, ५ व ८ नंबरचे लाकडी बरगे व स्टील गंजल्याने यातून पर सेकंद २.५० क्यूसेस पाणी वाहून जात आहे. पंपिंग स्टेशनला लागणारी पाण्याची पातळी राखण्यासाठी सातत्याने भोगावती नदीत धरणातून पाणी सोडावे लागत आहे. याचा परिणाम धरणातील पाणीसाठ्यावर होत असल्याने पावसाळा लांबल्यास पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्यावरही गंडांतर येणार आहे. यासाठी महानगरपालिकेने शहराच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन करून गळती काढणे गरजेचे आहे.
चौकट : पाणबुड्या आणून पाटबंधारे विभागाने चार पाच व आठ नंबरच्या गळ्यातील गळती काढण्याचा प्रयत्न केला होता. पण येथे पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने ते शक्य झाले नाही. यामुळे वाहून जाणाऱ्या पाण्यामुळे शिरोळपर्यंत पाणी पोहोचत आहे. सडलेले बरगे बदलण्यासाठी महापालिकेने टेंडरही दिले आहे. पण ती बदलण्यासाठी नियोजन नसल्याचे सांगण्यात येत आहे.
कोट : गेल्या दोन वर्षापासून महानगरपालिकेबरोबर या बंधाऱ्यातील गळती काढण्यासाठी पत्रव्यवहार सुरू आहे. या ठिकाणी पाण्याचा मोठा दाब असल्याने पाणी पातळी रिकामी करून हे काम करावे लागणार आहे. यासाठी पाटबंधारे विभाग महापालिकेला तांत्रिक मदत करेल. पण लवकरात लवकर ही गळती काढली नाही तर पिण्याच्या पाण्याबरोबर शेतीच्या पाण्यावरही याचा परिणाम होणार आहे.
संदीप दवणे, शाखा अभियंता पाटबंधारे.
फोटो
: १६ शिंगणापूर बंधारा
शिंगणापूर येथील महानगरपालिकेच्या मालकीच्या बंधाऱ्याला तळ बाजूने गळती लागल्याने लाखो लीटर पाणी वाहून जात आहे.