दत्ता बिडकर -हातकणंगले.
रोजगार हमीच्या पाणंद रस्त्याचे काम मजुरांच्या नावे हजेरी पगारपत्रक तयार करायचे आणि काम जे.सी.बी.च्या साहाय्याने पूर्ण करायचे. ग्रामसेवक आणि रोजगार सेवक यांच्या तडजोडीने काम हजारात आणि बिल लाखांत अशी स्थिती सहा गावांतील रोजगार हमीच्या पाणंद रस्त्याची झाली आहे.
राष्ट्रीय रोजगार हमी योजनेच्या गाव पातळीवरील कामांची संपूर्ण जबाबदारी ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाची असून रोजगार हमीच्या मजुरांचे हजेरीपत्रक तयार करणे, त्यांच्या कामावर देखरेख ठेवणे, मजुराचे पगारपत्रक व कामाची हत्यारे पुरवठा आणि औषाधोपचार पुरविण्याचे काम रोजगार सेवक आणि ग्रामसेवकाचे असून दोघांच्या सहमतीने कामच झाले नाही त्याचे कागदोपत्री रेकॉर्ड तयार केले जातात. गावपातळीवर काम मात्र जे.सी.बी. मशीनने करायचे आणि झालेल्या कामाचे मजूर हजेरी पगारपत्रक तयार करायचे काम ग्रामसेवक आणि रोजगार सेवकाच्या तडजोडीने पूर्ण केले जाते.
रोजगार हमीच्या पाणंद रस्त्यावर जे.सी.बी.ने किरकोळ डागडुजी करायची, पाणंद रस्त्याच्या दोनी बाजूंना जे.सी.बी.च्या साहाय्याने चर खोदायचे व तीच माती रस्त्यावर पसरायची अशा स्वरूपात पाणंद रस्त्याची कामे हजारांत करायची आणि मजुरांची लाखो रुपयांची बोगस हजेरी पगारपत्रके तयार करून लाखो रुपये कमवायचे, अशी स्थिती रोजगार हमीच्या कामाची झाली आहे.
चौकट...
साहित्याचा वापरच नाही
रोजगार हमी पाणंद रस्त्याच्या अंदाजपत्रकामध्ये लाखाच्या घरात साहित्याचा खर्च लावला जातो. यामध्ये रोलर फिरवणे, पाण्याचा टँकर आणि गरज असेल तेथे सिमेंट पाइप यांचा समावेश असतो. मात्र, या कोणत्याही साहित्याचा रोजगार हमीच्या कामावर वापरच केला जात नसल्याचे स्पष्ट होते आहे.
रोजगार हमीच्या पाणंद रस्त्याची कामे झाली नाहीत. बोगस मजूर पत्रके तयार करून लाखो रुपये हडप केले जात असल्याच्या तक्रारी गटविकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे पुराव्यासह दाखल करूनही प्रशासन दाद देत नाही. ज्यांनी रोजगार हमीचे काम केले नाही, त्याची बोगस पगारपत्रके तयार करून गैरव्यवहार केला जात आहे. याची चौकशी होणे गरजेचे आहे.
-के.डी. चव्हाण, अध्यक्ष, रुकडी शेतमजूर युनियन.