कोल्हापूर : शहरातील सहा प्राथमिक नागरी आरोग्य केंद्र व सीपीआर हॉस्पिटलमध्ये कोरोना प्रतिबंधात्मक लस दिली जात आहे. आज अखेर शहरातील १ लाख १४ हजार ४६२ पात्र लाभार्थींना पहिल्या डोसचे तर ४० हजार ७७४ लाभार्थींना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे. रविवारी एका दिवसात ३६४ जणांना लस देण्यात आले.
दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. शहरातील अनेक प्रभाग हॉटस्पॉट बनले आहेत. रोज मृतांची संख्याही दोन अंकी आहे. वाढणारा कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य प्रशासनातर्फे लसीकरणही केले जात आहे. सरकारकडून उपलब्ध होईल, त्याप्रमाणे पहिला आणि दुसरा डोस दिला जात आहे. शहरात आतापर्यंत लाखांवर नागरिकांना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. दुसरा डोस मिळालेले ४० हजारांवर आहेत. शनिवारी फिरंगाईतील प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रात चार, राजारामपुरी येथे ११, पंचगंगा येथे १२, कसबा बावडा येथे १०, महाडीक माळ येथे ६३, सदरबाजार येथे २५४ व सीपीआर हॉस्पिटल येथे १० जणांना असे एकूण ३६४ जणांना लस देण्यात आली.
आज दुसरा डोस..
कोव्हिशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या ४५ वर्षावरील नागरिकांनी दुसरा डोस घेण्यासाठी आज रविवारी (दि. ३०) नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपस्थित राहावयाचे आहे. याकरिता पात्र लाभार्थींना संबंधित प्राथमिक नागरी आरोग्य केंद्रावरुन दुसऱ्या डोससाठी फोन येईल, त्यांनीच केंद्रावर वेळेत उपस्थित रहावे. कोव्हॅक्सिनचा पहिला डोस घेऊन २८ दिवस झालेल्या लाभार्थींनी दुसऱ्या डोससाठी आज रविवारीच कसबा बावड्यातील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रात लस घ्यावी असे, आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.