कोल्हापूर : कोल्हापुरात अंबाबाईसह जोतिबाचे दर्शन घेण्यासाठी येणाºया भाविकांचे पर्यटकांत रूपांतर व्हायचे असेल तर परगावहून येणाºया व्यक्ती आपले पाहुणे आहेत असे समजून त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे. अगदी गजरे विकणाºया फेरीवाल्यापासून ते लहान-मोठे व्यावसायिक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये पर्यटन हा एक मोठा उद्योग असून, त्यातून रोजगार निर्मिती आणि शहराचा विकास साध्य होणार आहे, याबद्दल जागृती होणे गरजेचे आहे, असे मत कोल्हापुरातील मान्यवरांनी व्यक्त केले.
परगावहून आलेल्या भाविकांना कोल्हापूर व येथील सोईसुविधा कशा वाटतात याबद्दल जाणून घेण्यासाठी ‘लोकमत’च्या वतीने १०० भाविकांचे सर्वेक्षण करण्यात आले. देण्यात आलेल्या प्रश्नावलीत त्यांनी येथील यात्री निवासातून होणारी गैरसोय, पार्किंग व्यवस्था, दिशादर्शक फलकांचा अभाव, अन्नछत्राची सोय, अन्य पर्यटन स्थळे माहीत नाहीत अशा विविध प्रकारच्या अडचणी मांडल्या. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर कोल्हापुराती मान्यवरांनी दूरध्वनी करून पहिल्यांदा पर्यटकांना सहन कराव्या लागणाºया अडचणींना वाचा फोडल्याबद्दल ‘लोकमत’चे आभारच मानले; पण हे चित्र बदलायचे असेल तर स्थानिक नागरिकांसह विविध शासकीय प्रशाासकीय यंत्रणांनीही पुढाकार घेण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.
श्री अंबाबाई आणि राजर्षी शाहू महाराजांच्या कृपेने कोल्हापुरात पर्यटनाला येण्यासाठी परगावच्या लोकांना आमंत्रित करावे लागत नाही; कारण येथे रोजच भाविकांचे लोंढेच्या लोंढे येतात. गरज आहे ती फक्त त्यांना पर्यटनस्थळे पाहण्यासाठी प्रवृत्त करण्याची. त्यासाठी स्थानिकांमध्ये पर्यटन संस्कृती रुजणे आवश्यक आहे.
कोल्हापुरात आलेल्या भाविकाच्या बेड अॅँड ब्रेकफास्टची सोय मंदिराच्या परिसरात यात्री निवास चालविणाºया रहिवाशांकडून होणे गरजेचे आहे. भाविकांना कोल्हापुरातील अन्य पर्यटन स्थळेच माहीत नाहीत, त्यांना माहिती सांगणारे गाईड मिळत नाहीत, त्या ठिकाणी पोहोचण्यासाठीचे पर्याय उपलब्ध नाहीत, योग्य दरात कोल्हापूरची खासियत असलेले खाद्यपदार्थ, जेवण तसेच वस्तू कुठे मिळतील माहीत नाही. या सगळ्या गैरसोयींचा विचार करून नव्या पिढीने त्याला रोजगारात बदलले पाहिजे. आज नव्या पिढीसमोर बेरोजगारीचा प्रश्न आहे; पण भाविक आणि पर्यटकांच्या रूपाने रोजगार तुमच्यासमोर आहे. तरुणाईने आपली ऊर्जा आणि सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत या क्षेत्रात पाऊल ठेवले तर खूप मोठा बदल होणार आहे. ही जागृती होण्यासाठी कार्यशाळेचे आयोजन केले पाहिजे.- मधुरिमाराजे छत्रपतीपर्यटन उद्योगाचा स्वीकार करा...परगावहून येणाºया नागरिकांमध्ये ९० टक्के वर्ग हा फक्त भाविक असतो. हे भाविक देवीचे दर्शन घेतात आणि निघून जातात. त्यांनी कोल्हापुरातील अन्य प्रेक्षणीय स्थळे पाहणे म्हणजे भाविकाचे पर्यटकात होणारे रूपांतर; पण कोल्हापूरकरांमध्ये अजूनही येणारे भाविक किंवा पर्यटनाला उद्योग म्हणून स्वीकारणे ही संकल्पना रुजलेली नाही. कोल्हापुरात आल्यापासून पर्यटक परत जाईपर्यंत शक्य तितक्या कमी दरात चांगल्या सोईसुविधा पुरविल्याने मला आर्थिक फायदा होणार आहे आणि पर्यायाने कोल्हापूरचाही विकास होणार आहे असा विचार करून पर्यटकांचे आदरातिथ्य झाले पाहिजे. पर्यटक मित्र, टूर आॅपरेटर म्हणूनही या क्षेत्रात खूप संधी आहेत.- वसीम सरकवास (कारवा हॉलिडेज)भाविकांना अल्प दरात चांगल्या सोईसुविधांसह राहण्याची सोय होणे म्हणजे यात्री निवास. मात्र कोल्हापुरात अनेक अनधिकृत यात्री निवास असून प्रचंड गैरसोयी आहेत. घराघरांतील यात्री निवासांना महालक्ष्मी किंवा अंबाबाई नाव दिल्याने भाविकांचा होणारा गोंधळ निश्चितच. त्यामुळे नोंदणी परवाना देतानाही नावाचा विचार झाला पाहिजे. तेथील सोई, दरफलक, पावती पुस्तक, हिशेब यांची तपासणी करून महापालिका आणि पोलिसांनी यात्री निवासांवर बंधने घालणे गरजेचे आहे.राजू मेवेकरी (अध्यक्ष, महालक्ष्मी भक्त मंडळ व अन्नछत्र सेवा ट्रस्ट)