कागल : एकीकडे दीपावलीसाठी लागणाऱ्या ‘मेड इन चायना’ वस्तूंऐवजी भारतीय बनावटीच्याच वस्तू वापरण्याचे आवाहन केले जात असताना वेगवेगळ्या मतिमंद, अंध, कर्णबधिर, मूकबधिरांनी तयार केलल्या वस्तूंनाही या निमित्ताने मागणी येत आहे. कागलमधील स्वर्गीय गणपतराव गाताडे निवासी-अनिवासी मतिमंद विद्यालयाच्या ६२ विद्यार्थ्यांनी या दीपावलीसाठी दीड हजार आकर्षक आकाशकंदील, तर पाच हजार मातीच्या पणत्या तयार केल्या आहेत. आकाशकंदील, पणत्या, मेणबत्ती, खडू, फिनेल तयार करण्याचे प्रशिक्षण या मतिमंद विद्यार्थ्यांना येथील शिक्षकांकडून दिले जाते. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या या वस्तू विक्री करण्यासाठी येथील शिक्षक, कर्मचारी विविध शाळा, बँकांच्या शाखा, शासकीय कार्यालयांत जाऊन वस्तू खरेदीचे आवाहन करतात. चालूवर्षी या वस्तूंच्या उत्पादनात वाढ केल्याने दीड हजार आकाशकंदिलांची, तर पाच हजार पणत्यांची निर्मिती झाली आहे. कागल शहरात स्वतंत्र स्टॉल विक्रीसाठी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्याध्यापिका आयेशा नदाफ, नंदिनी खैरे, तृप्ती गायकवाड, स्मिता नीलकंठ, विठा चव्हाण, अनुजा हेरवाडे हे शिक्षक या विद्यार्थ्यांकडून या वस्तू बनवून घेतात. मतिमंद मुले ही शारीरिकदृष्ट्या गतिमंद असतात. त्यांच्या शरीराला, मेंदूला व्यायाम देण्याबरोबरच त्यांची एकाग्रता तयार करण्यासाठी अशा उपक्रमांची जोड दिली जाते. याचबरोबर वस्तूंची निर्मिती करून ते स्वावलंबी बनावेत, हा देखील हेतू असतो. लोकांनी दीपावली व इतर कारणांसाठी या विद्यार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तू घेऊन त्यांचा आनंद द्विगुणित करावा, असे आमचे आवाहन आहे. - आयेशा नदाफ, मुख्याध्यापिका.
मतिमंद विद्यार्थ्यांनी बनविले दीड हजार आकाशकंदील
By admin | Published: October 24, 2016 12:48 AM