लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या महिला व बालकल्याण समितीमार्फत महानगरपालिकेच्या २० प्राथमिक शाळांमध्ये ‘मिनी सायन्स सेंटर’ सुरू होणार आहे. समितीच्या बजेटमधून हे सेंटर सुरू करण्याबाबतचा सदस्य ठराव मंजूर झालेला आहे. त्यानुसार आॅफिस प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून लवकरच महापालिका शाळांमध्ये ‘मिनी सायन्स सेंटर’ सुरू केली जाणार असल्याची माहिती महिला व बालकल्याण समितीच्या सभापती वहिदा सौदागर यांनी पत्रकाद्वारे दिली.मुंबई महानगरपालिकेच्या शाळा, आदिवासी विभागातील शाळा, आश्रमशाळा, डोंगराळ भागातील शाळा येथे ‘मिनी सायन्स सेंटर’ सुरू आहेत. या शाळांमध्ये विविध मॉडेल्सच्या माध्यमातून मुले-मुली स्वत: प्रयोग करून विज्ञान आणि गणित हे विषय सोप्या पद्धतीने शिकत आहेत. कोल्हापूर शहरातील मुले-मुली या तंत्रज्ञानापासून फारच अलिप्त आहेत. त्यासाठी कोल्हापूर महानगरपालिकेच्या शाळांमध्ये ‘मिनी सायन्स सेंटर’ सुरू करण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रयोग सोप्या आणि सुलभ माध्यमातून समजावेत म्हणून शिक्षकांना ‘मिनी सायन्स सेंटर’मधील मॉडेल्स हाताळण्याचे आणि अवघड प्रयोग सोप्या पद्धतीने समजावून सांगण्याचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.तर पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ घडतीलविद्यार्थ्यांना लहान वयातच वेगवेगळ्या प्रयोगांच्या संधी उपलब्ध करून देऊन विज्ञान व गणित विषयांची गोडी लावली तर त्यातून पुढच्या पिढीतील शास्त्रज्ञ नक्कीच घडू शकतात. किमान विद्यार्थ्यांमध्ये शास्त्रीय दृष्टिकोन तरी निश्चितच निर्माण होऊ शकतो. हाच दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून हे ‘मिनी सायन्स सेंटर’ सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती सभापती सौदागर यांनी दिली.
वीस शाळांत सुरू होणार ‘मिनी सायन्स सेंटर’
By admin | Published: July 04, 2017 1:14 AM