आंजर्ले : नववर्षाच्या स्वागतासाठी दापोली सज्ज झाली आहे. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीसाठी दापोलीतील सर्व हॉटेल्स्, रिसॉर्ट, घरगुती निवास व्यवस्था आरक्षित झाल्या आहेत. गोव्यात साजरा होणारा क्रूज फेस्टिवल यावर्षी दापोलीतील दाभोळ येथे साजरा होत असून, पर्यटकांसाठी हे एक नवीन आकर्षण ठरणार आहे. दापोलीत शनिवारी-रविवारी या सुटीच्या दिवशी पर्यटक येतात. मात्र, आठवड्यातील पाच दिवस शुकशुकाट असतो. यामुळे हॉटेल्स् व्यावसायिक दीपावली, उन्हाळ्यातील एप्रिल, मे व २५ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीकडे डोळे लावून बसलेले असतात. कारण या तिन्ही हंगामात राज्यभरातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात आणि आर्थिक उलाढाल ही मोठ्या प्रमाणावर होते. त्यामुळे ‘आॅफ सिझन’ची भरपाई याच दिवसांमध्ये भरून निघते. त्यामुळे हे तीन हंगाम महत्त्वपूर्ण ठरतात. त्यातच आता नववर्षानिमित्तच्या २५ डिसेंबर ते ५ जानेवारी या हंगामाला सुरूवात झाली आहे. दापोलीतील सर्व हॉटेल्स्, रिसॉर्ट, घरगुती निवास व्यवस्था २५ डिसेंबर ते ५ जानेवारी या कालावधीसाठी आरक्षित झाली आहेत. दापोलीत नववर्षाचा जल्लोष साजरा करण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेल्स्, रिसॉर्ट चालक सज्ज झाले आहेत. काही हॉटेल्स्चालकांनी करमणुकीच्या कार्यक्रमांचे आयोजनही केले आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी येणारे जास्तीत जास्त पर्यटक आपल्याकडे खेचण्यासाठी काही हॉटेल्स्चालकांनी खास पॅकेज जाहीर केले आहेत. या पॅकेजमध्ये अमर्याद जेवण सोबत नृत्यासाठी संगीत अशी व्यवस्था करण्यात आली आहे. हे पॅकेज जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी हॉटेल चालकांनी दापोली शहरात बॅनर्स लावले आहेत. त्याव्दारे साऱ्यांचे लक्ष वेधण्याचे प्रयत्न हे हॉटेल व्यावसायिक करीत आहेत. वॉटर स्पोटर्स् चालकांनीही सज्जता केली आहे. डॉल्फीन सफरी, बनाना रायडिंग अशा पर्यटकांचे आकर्षण असलेल्या पाण्यातील खेळांची सज्जता ठेवण्यात आली आहे. गोव्यात दरवर्षी साजरा होणाऱ्या क्रूज फेस्टिवलची संकल्पना दापोलीतील दाभोळ येथे रूजवण्यात येत आहे. त्यामुळे गोव्यातील क्रूज फेस्टिवलचा आनंद पर्यटकांना आता दापोलीतही अनुभवता येणार आहे. (वार्ताहर)नववर्षाच्या स्वागतानिमित्त आमच्याकडे बुकिंग फुल्ल झाले आहे. पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आहे. पर्यटकांना स्वादिष्ट भोजन देण्याचे व कौटुंबिक वातावरण देण्याचे आम्ही नियोजन केले आहे.- अभिजीत भोंगले, हॉटेल व्यावसायिक, दापोली
मिनीमहाबळेश्वरला लागले वर्षारंभाचे वेध...
By admin | Published: December 29, 2014 9:51 PM