कोल्हापूर : याआधीचं सरकार हे बोलणारं सरकार होतं आणि आत्ताच सरकार हे काम करणारं सरकार आहे अशा शब्दांत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी महाविकास आघाडीला मंगळवारी टोला लगावला.
कोल्हापुरात ते पत्रकारांशी बोलत होते. पालकमंत्री म्हणाले, की शेतकऱ्यांना वीज माफक दरात मिळावी हे बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होतं. आधीच्या सरकारने ते केलं नाही. परंतु आम्ही मात्र याबाबत निर्णय घेतला. पेट्राेल-डिझेलच्या दरवाढीने नागरिकांना झळ बसत होती. परंतु आधीच्या सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही. त्यासाठी आमचे सरकार यावे लागले. दिवाळी गोड करण्यासाठी आधीच्या सरकारने काही केलं नाही. आम्ही ४०० रुपयांच्या वस्तू १०० रुपयात द्यायला सुरू केल्यावर त्या कुठे वेळेत मिळाल्या नाहीत म्हणून टीका करायची हे बरोबर नाही. भूविकास बॅंकेच्या कर्जमाफीसाठी ९७० कोटी द्यायचे होते. तेवढेही यांनी दिले नाहीत. स्वार्थाच्या कामाला हे पैसे वळवले असा आरोपही केसरकर यांनी केला.
कोणत्या पक्षाचा पाठिंबा घ्यायचा हे मुख्यमंत्री ठरवतील असे सांगून केसरकर म्हणाले की, गेले काही महिने केवळ आमच्या टीका करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांसाठी मागणी केल्याचे ऐकून बरे वाटले.उद्धव यांच्याबद्दल आदर आहे. परंतु जलयुक्त शिवार योजना बंद करताना तुम्हाला समोर शेतकरी का दिसला नाही, असा सवालही केसरकर यांनी उपस्थित केला.
प्रक्रिया आणि साठवणुकीवर भर
शेतकऱ्यांना दोन पिके कशी घेता येतील, शेतमालावर प्रक्रिया कशी करता येईल आणि साठवणूक कशी करता येईल यासाठी चर्चा सुरू असून एशियन डेव्हलपमेंट बॅंकेच्या माध्यमातून एक मोठा प्रकल्प लवकरच घोषित होईल असे सूताेवाचही केसरकर यांनी केले.
सोशल मीडियाचाही करणार वापर
सध्या समाजामध्ये सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे शासनाचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी सरकारही सोशल मीडियाचा वापर वाढवण्यावर भर देणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.