कोल्हापूर : हसन मुश्रीफ हे ज्येष्ठ मंत्री आहेत, त्यांची माफीच का? त्यांच्या पायावर लोटांगण घालण्यास तयार आहोत, फक्त त्यांनी पुण्यातील ‘पब’ संस्कृती हद्दपार करावी. ससून रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्याबद्दल अनेक तक्रारी येऊनही मंत्री मुश्रीफ यांनी त्यांना पाठीशी घातले. डॉ. तावरे व मुश्रीफ यांचे लागेबंधे असल्याचा आरोप आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.आमदार धंगेकर हे शुक्रवारी कोल्हापुरात आले असता ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. आमदार धंगेकर म्हणाले, पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते, येथे देशभरातून विद्यार्थी शिकायला येतात; पण त्यांना चुकीच्या मार्गाला लावण्याचे काम काही यंत्रणा करीत असताना राज्य सरकार त्यांना पाठीशी घालत आहे. कल्याणीनगर अपघात प्रकरणाचा शेवट लावल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. माझं पुणे सुरक्षित नसेल तर आमदार, खासदारकीचे मुकुट मला काय करायचे? या प्रकरणात मला धमक्याही दिल्या आहेत. हसन मुश्रीफ यांनी तर माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. मी पुणेकर आहे, कोणाला घाबरत नाही. त्यांची माफीच का? त्यांच्या पायावर लोटांगण घालतो, त्यांनी पुण्यातील ‘पब’ संस्कृती हद्दपार करावी. मुळात मंत्री मुश्रीफ यांनाही या गोष्टी पटलेल्या नाहीत; पण ते सरकारसोबत असल्याने नाइलाज आहे. वडिलांसारख्या शरद पवार यांना मंत्री मुश्रीफ सोडून गेले. त्यांनी मला दम देऊ नये, असा इशारा देत एवढेच त्यांना वाटत असेल तर हे प्रकरण जलद न्यायालयात न्यावे, असेही त्यांनी सांगितले.
पुरावे नष्ट करण्याची भीतीससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. काळे हे सरकारविरोधात लढून ‘मॅट’मधून आले होते. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवून त्या ठिकाणी आपल्या मर्जीतील अधिकारी नेमून पुरावे नष्ट करण्याची भीती आम्हाला वाटत असल्याचे आमदार धंगेकर यांनी सांगितले.