कोल्हापूर : वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्यांमुळे रुग्णसेवेवर परिणाम होत आहे. त्यामुळे यापुढे गरज असेल तरच वैद्यकीय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात येतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी कोल्हापुरात सांगितले. नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कोल्हापूर विभागीय केंद्राचे उदघाटन मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. शेंडा पार्कातील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या या कार्यक्रमसाठी आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरु, निवृत्त लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर यांची प्रमुख उपस्थिती होती.मंत्री मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय महाविद्यालयाची जागा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुढाकारातून विभागीय केंद्रासाठी दिली आहे. या जागेची एनओसीची प्रक्रिया तत्काळ करून घ्या. या विभागीय केंद्राच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे संशोधन व्हावे. इमारत, इतर सुविधांसाठी विद्यापीठाकडे निधी नसेल तर सरकारच्यावतीने तो उपलब्ध करून दिला जाईल.कुलगुरु कानिटकर म्हणाल्या, विद्यापीठाच्या सर्व विभागीय केंद्रांमध्ये संशोधन प्रकल्प सुरु करण्यात येणार आहेत. मुंबईतील ऐरोलीत वैद्यकीय तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प सुरु आहे. कोल्हापूर विभागीय केद्रातही फॅमिली डॉक्टरवर आधारित त्यांच्या जीवनशैलीचा अभ्यास करण्याच्या दृष्टीकोनातून संशोधन प्रकल्प सुरु करण्यात येईल. येथे लवकरच तीन-चार कर्मचारी व इतर स्टफ कार्यान्वित करून हे केंद्र सुरु करू. विविध अभ्यासक्रमही या केंद्रातून सुरु केले जातील. हाऊसकिपिंग, सुरक्षा हे अधिष्ठातांचे काम नव्हेसरकारी रुग्णालयातील हाऊसकिपिंग, सुरक्षा व्यवस्था हे अधिष्टातांचे काम नाही. पण आपल्याकडे या सगळ्यांची जबाबदारी अधिष्ठातांच पाहतात. यामुळे त्यांचे मूळ आरोग्यसेवेचे काम बाजूलाच राहते. त्यामुळे हा विभागच वेगळा करणे गरजेचे असल्याचे मुश्रीफ म्हणाले.अवयवदानावर प्रबोधन व्हावेअवयवदान चळवळीबाबत प्रबोधन होणे गरजेचे आहे. सर्वसामान्य रुग्णांना सरकारी रुग्णालयांबाबत विश्वास वाढला पाहिजे यादृष्टीने काम करा असेही मुश्रीफ म्हणाले
रुग्णसेवेवर परिणाम, वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्याबाबत मंत्री हसन मुश्रीफांनी दिली महत्वाची माहिती
By पोपट केशव पवार | Published: October 16, 2023 3:49 PM