महाविकास आघाडीकडून शाहू महाराज छत्रपती यांना कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं जाईल, अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात रंगत आहे. गेल्या काही दिवसांआधी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी शाहू महाराज यांची भेट देखील घेतली होती. त्यामुळे शाहू महाराज लोकसभा लढवणार की नाही, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
शाहू महाराज लोकसभा लढवण्याच्या चर्चांवर अजित पवार गटाचे आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरच्या जागे संदर्भात जे काही ठरेल ते दोघांच्या (भाजपा, शिवसेना) संमतीने ठरेल. शाहू महाराजांनी लोकसभेसाठी उभं राहू नये असं आम्हाला वाटतं. ते आम्हा सर्वांचे आदर्श होते. त्यांनी राजकारणात यावं की नाही यावं हा त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. ते एक आदर्श व्यक्तिमत्व असल्यामुळे त्यांनी तसेच राहावं, अशी आमची इच्छा होती, असं हसन मुश्रीफ म्हणाले. कोल्हापूरात हसन मुश्रीव यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान, महाराष्ट्रात गेल्या काही काळापासून मोठी राजकीय उलथापालथ सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन पक्ष फुटल्यानंतर आता राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसमधील नेतेही पक्षांतर करू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीला बळकटी देण्यासाठी मुत्सद्दी शरद पवारांकडून नवनवीन लोकांना राजकीय मैदानात उतरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे.
तुमची इच्छा असेल तर जबाबदारी स्वीकारु-
तुमची सर्वांची इच्छा असेल तर मी जबाबदारी स्वीकारायला तयार आहे, असे सांगत शाहू छत्रपती यांनी आपल्या लोकसभा उमेदवारीबाबत स्पष्टपणे संकेत दिले. तुम्ही ज्या ब्रेकिंग न्यूजची वाट पहात आहात ती फक्त ब्रेकिंग न्यूज नसेल. तर ती मोठी जबाबदारी आहे. तुमच्या सर्वांची इच्छा असेल तर मी कामासाठी नेहमी उपलब्ध आहे. ही ब्रेकिंग न्यूज ऐशआराम करण्यासाठी नसून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठीची असेल. आता ही प्रश्न सोडवले जात आहेत. परंतु ते अधिक गतीने आणि व्यापक पद्धतीने सोडवण्यासाठी तुम्हा सर्वांचे मार्गदर्शन लागणार आहे. तुम्ही म्हणता तशी बातमी आलीच तर आपल्या आणखी एक, दोन बैठकाही होतील. मी तुमच्याशी संवाद साधेन, असं शाहू महाराज यांनी सांगितले.