कोल्हापूर : महापालिकेच्या निवडणुकीत तत्कालीन आघाडीत आमदार विनय कोरे यांच्यासोबत मी जरूर होतो. परंतु, त्यांनी पैसे देताना मी नव्हतो, असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, कोणत्याही निवडणुकीत घोडेबाजार होऊ नये, यासाठी विधानपरिषद निवडणूक त्यांनी बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुषंगाने विनय काेरे यांनी वक्तव्य केले. मात्र, त्याचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. त्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नाही. महापालिका निवडणुकीत कसे लढायचे हे अद्याप ठरलेले नाही. बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिलेल्या निर्णयाचे आपण स्वागत करतो. या निर्णयामुळे शेतकरी आणि शौकीन आनंदी झाला आहे. कोल्हापुरात बैलगाडी शर्यत आणि कुस्तीला मोठे महत्त्व आहे.
गव्यांचा बंदोबस्त करू
या गव्यांचा बंदोबस्त करावा यासाठी वन विभागाशी चर्चा केली आहे. त्यांना ताबडतोब बंदोबस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत. गव्याला बेशुद्ध करून सुरक्षितपणे जंगलात सोडण्याची गरज असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.
ओबीसींचा डेटा मागण्यात गैर काय..?
महाविकास आघाडीने ओबीसी आरक्षण घालवल्याचा भाजपने केलेला आरोप चुकीचा आहे. २०११ ला जातिनिहाय जनगणना झाली असताना त्यांनी डेटा उपलब्ध करून दिला नाही. देवेंद्र फडणवीस, पंकजा मुंडे यांनी केंद्राला यासंदर्भात पत्र पाठवली होती. मग आम्ही डेटा मागणे चुकीचे कसे..? अशी विचारणा मुश्रीफ यांनी केली.
पडळकर यांना आवरा..
गोपीचंद पडळकर यांच्या वक्तव्यामुळे कायदा सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ शकतात. आमदार झालो म्हणजे असे बोलण्याचा परवाना मिळाला असे समजण्याची गरज नाही. बोलताना भान राखण्याची गरज आहे. अशा लोकांमुळे आपल्या पक्षाची पातळी घसरत चालली असल्याचे भाजपने भान बाळगावे, असे मुश्रीफ यांनी सांगितले.