समीर देशपांडेकोल्हापूर : मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानसभेचे अधिवेशन असतानाही ज्या-ज्या आवश्यक आहेत अशा घातलेल्या जोडण्या, राष्ट्रवादीने केलेली उमेदवारांची अचूक निवड, विरोधकांच्या प्रचारासाठी त्यांच्याच नेत्यांनी फिरवलेली पाठ आणि एकूणच सभासदांमधील प्रतिमा या जोरावर राष्ट्रवादीच्या आघाडीने आजरा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत एकतर्फी बाजी मारली. जरी सतेज पाटील आणि विनय कोरे यांनी सातत्याने बैठका घेऊन राष्ट्रवादीविरोधात आघाडी केली असली तरी मुश्रीफांनी या दोघांसह त्यांच्या आघाडीला लीलया धूळ चारली. राष्ट्रवादीचे सर्व उमेदवार हे सरासरी ८०० मतांच्या फरकाने विजयी झाले.
मुश्रीफ, पाटील, कोरे यांच्या बैठकांतून पदरात जास्त जागा पडत नाहीत, असे दिसल्यानंतर राष्ट्रवादीने रिंगणातच न उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांना आपलाच निर्णय बदलावा लागला आणि त्यासाठी मुश्रीफ यांचे मन वळवावे लागले. राष्ट्रवादी भ्याली, असा आरोप होत असल्याने मुश्रीफांनीही कार्यकर्त्यांसाठी पुन्हा शड्डू ठोकला आणि या निवडणुकीला वेगळेच वळण लागले.अशोक चराटी कारखान्याचे अध्यक्ष झाल्यानंतर ज्या पद्धतीने त्या ठिकाणी कारभार झाला त्यालाच राष्ट्रवादीने टार्गेट केले. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी चराटी यांच्याविरोधात आंदोलन करत गाडीही काढून घेतली होती. हे सातत्याने राष्ट्रवादीचे नेते भाषणातून सांगत राहिले. कामगारांना हाताशी धरून हे कटकारस्थान रचले गेले, हे अशोक चराटी सांगत राहिले. परंतु त्याचा परिणाम फारसा झाला नाही.राष्ट्रवादीच्या विजयाची कारणे
- मंत्री हसन मुश्रीफ यांनी एकदा आघाडी करण्याचे ठरल्यानंतर सूत्रे आपल्याकडे घेतली. उमेदवारी नेटकी कशी दिली जाईल, हे पाहिले. मुकुंद देसाई निवडणुकीसाठी तयार नव्हते. त्यांना तयार केले. कुठेही उमेदवार कच्चा राहणार नाही, याची दक्षता घेतली. याउलट चराटी, शिंपी, शिंत्रे, रेडेकर आघाडीकडे काही उमेदवार हे स्वत:चे काहीच वलय नसलेले होते.
- प्रचारासाठी मुश्रीफ मंत्री असून आणि नागपूरचे अधिवेशन सुरू असूनही तीन वेळा विमानाने येऊन आजऱ्यात प्रचार सभांसाठी हजर राहिले. उर्वरित जोडण्यांचे काम नविद यांच्याकडे दिले. कुठेही कमतरता पडणार नाही, याची त्यांनी दक्षता घेतली. याउलट ज्यांनी विरोधी आघाडी स्थापन केली ते सतेज पाटील एकदाच आजरा तालुक्यात आले. विनय कोरे तिकडे फिरकलेच नाहीत. मंत्री चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, संजय मंडलिक तिकडे आलेच नाहीत. मतदारसंघ असल्याने नाही म्हणायला प्रकाश आबिटकर आणि समरजित घाटगे यांनी एक- दोन फेऱ्या मारल्या. त्यामुळे पराभूत आघाडीला जोडण्या घालताना मर्यादा आल्या.
- मतदानाला चार दिवस असताना ‘ब’ वर्गातील मतदाराला खालच्या चारही उमेदवारांना मतदान करता येईल, असा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेला निर्णय राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडला. हा निर्णय कोणामुळे ऐन मतदानाआधी दिला गेला असेल, हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची गरज नाही.
- विरोधी आघाडीचे नेते अशोक चराटी, सुनील शिंत्रे यांना सर्व पातळ्यांवर धावपळ करावी लागली. परंतु मुश्रीफ यांनी गडहिंग्लजची आपली तगडी टीम राष्ट्रवादीच्या आपल्या शिलेदारांच्या पाठीशी उभी केली. बिद्रीच्या विजयामुळे सुसाट सुटलेल्या के. पी. पाटील यांनीही आपली यंत्रणा लावत पुढची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून जोडण्या घातल्या. ज्यामुळे दिवसेंदिवस राष्ट्रवादीची आघाडी बळकट होत गेली.
- चंदगडचे आमदार राजेश पाटील यांनी आगामी निवडणूक डोळ्यासमोर ठेवत आपल्या परिसरात राष्ट्रवादीसाठी जोडण्या घातल्या. त्यामुळे सुनील शिंत्रे, अंजना रेडेकर यांच्या परिसरातही मोठ्या फरकाने पिछाडीवर जावे लागले.
- येणाऱ्या विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम समजून हसन मुश्रीफ, के. पी. पाटील आणि आमदार राजेश पाटील यांनी घेतलेले परिश्रम राष्ट्रवादीला विजयापर्यंत घेऊन गेले.
सुधीर देसाई चमकलेया सगळ्या प्रक्रियेमध्ये जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई हे चमकले. बिनविरोधच्या चर्चेवेळीही ते जादा जागांसाठी आक्रमक होते. हे होत नाही म्हटल्यानंतर माघारीचा निर्णय जाहीर करणे, सर्वांना घेऊन पुन्हा मुश्रीफ यांच्याकडे जाऊन बसणे, आघाडीचा निर्णय घेण्याचा आणि मुकुंद देसाईंच्या उमेदवारीसाठी आग्रही राहणे, स्वत: उमेदवारी न घेता राखीव महिलामधील उमेदवारी वहिनींसाठी घेऊन ताकद लावणे, या सर्व पातळ्यांवर सुधीर देसाई अग्रभागी राहिले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून देसाई मुश्रीफ यांच्या अतिशय जवळचे झाल्याने इतरांनीही त्यांना एकमुखी पाठबळ दिल्याचे चित्र यावेळी दिसून आले. बिनविरोधकडे झुकलेली निवडणूक लावून ती जिंकण्यामध्ये सुधीर देसाई यांची भूमिका महत्त्वाची राहिली. त्यांना मुकुंद देसाई यांनी खंबीर पाठबळ दिले.