चंदगड : पुणे, पदवीधर मतदार संघ हा भाजपाचा बालेकिल्ला आहे. त्यामुळेच या मतदार संघात महाआघाडीने विजय खेचून आणण्यासाठी प्रयत्न चालविला आहे. यासाठी मंत्री हसन मुश्रीफ व मंत्री जयंत पाटील यांनी कंबर कसली आहे. दिवसातून चारवेळा माझ्या नावाचा जप या लोकांनी सुरू ठेवला असून माझे नाव घेतल्याशिवाय त्यांना रात्री झोप येत नाही, असा टोला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी हाणला.
चंदगड येथे पुणे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार संग्राम देशमुख व शिक्षक उमेदवार जितेंद्र पवार यांच्या प्रचारार्थ आयोजित मेळाव्यात ते बोलत होते. पाटील म्हणाले, मराठा आरक्षण कोणी दिले व घालविले हे लोकांना माहिती आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न उच्च न्यायालयात टिकवला, सुप्रित कोर्टात एक वर्ष हा प्रश्न टिकवून धरला होता. पण, महाआघाडीने सरकार आले आणि आरक्षण टिकले नाही हे कुणी केले हे सर्वांना माहित आहे. त्यामुळे आरक्षणाबाबत आमची भूमिका काय होती हे मुश्रीफ, अजित पवार व जयंत पाटील यांनी सांगायची गरज नाही.
भाजपाचे दिलेले पदवीधर व शिक्षकचे उमेदवार हे स्वच्छ चारित्र्य व लढवय्ये वृत्तीचे असल्याने नक्की निवडून येतील. यावेळी माजी मंत्री भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, शिवाजीराव पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. सभापती अॅड. अनंत कांबळे, उपसभापती मनिषा शिवणगेकर, माजी सभापती शांताराम पाटील, बबन देसाई, समृद्धी काणेकर, रत्नप्रभा देसाई, राम पाटील, संदीप नांदवडेकर, नितीन फाटक, भावकू गुरव, भरमू पाटील, सुनिल काणेकर आदींसह पदवीधर युवक, शिक्षक उपस्थित होते.