आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर , दि. 0६ : सरकारविरोधातील मोर्चात जर मंत्रीच उतरत असतील तर आता महाराष्ट्रातील जनतेने न्याय कोणाकडे मागायचा, असा सवाल करीत ‘स्वाभिमानी’चा मोर्चा आणि राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांचा सहभाग म्हणजे बनवेगिरीचा कळस झाला असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक करणाऱ्यांना शेतकरीच मातीत घातल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी केली.
विजय जाधव यांच्या अस्थिकलश दर्शन यात्रेचा प्रारंभ शनिवारी कोल्हापुरातून झाला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पाटील यांनी सरकारसह ‘स्वाभिमानी’ शेतकरी संघटनेवर आसूड ओढले. कॉँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटना हे सर्वजण कर्जमाफीची मागणी करतात. या पक्षांचे सभागृहात स्पष्ट बहुमत असताना या मंडळींची सभागृहाबाहेर ‘नौटंकी’ सुरू आहे. सरकारविरोधातील मोर्चात राज्यमंत्री उतरतात आणि त्याच ठिकाणी मुख्यमंत्र्यांना शिव्यांची लाखोली वाहिली जाते. हे म्हणजे देवेंद्रजी, अजब तुमचे सरकार आणि धन्य धन्य ते मुख्यमंत्री, असेच म्हणावे लागेल. सिंचनाअभावी विदर्भ, मराठवाड्यातच आत्महत्या होतात, असा निष्कर्ष सरकार काढते; पण राजर्षी शाहू महाराजांच्या दुरदृष्टीमुळे पाण्याच्या बाबतीत समृद्ध असलेल्या कोल्हापुरातील शेतकरी आत्महत्या का करीत आहेत? ही सरकारला चपराक आहे. शेतकऱ्यांचे उत्पादन दुप्पट झाले तर आत्महत्या होणार, असे सरकारचे म्हणणे आहे; पण देशाची ४० कोटी लोकसंख्या असताना गहू, मिलो, तांदूळ आयात करून पोट भरावे लागत होते. त्यावेळी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. आता १३० कोटी लोकसंख्या होऊन पाचपट उत्पादन वाढले तरीही आत्महत्या होतात. याला सरकारचे धोरण कारणीभूत असल्याचा आरोप पाटील यांनी केला.
नेते सत्तेत, पण समाज तिथेच
मराठा आरक्षणासाठी पुढे असणारे संभाजीराजे यांना भाजपने खासदार केले. धनगर आरक्षणासाठी लढणाऱ्या महादेव जानकर यांना मंत्री, तर शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांना राज्यमंत्री केल्याने या घटकांचे सगळे प्रश्न मार्गी लागतील, अशी अपेक्षा होती; पण या नेत्यांना पदे मिळाली पण समाज आणि शेतकऱ्यांचे प्रश्न तिथेच असल्याची टीका पाटील यांनी केली. तगादा लावाल तर हिसका दाखवू कर्जवसुलीसाठी तगादा लावणाऱ्या बॅँकांची यापूर्वी फार वाईट अवस्था केली. बॅँकेच्या तगाद्यामुळेच कोडोली येथील शितापे यांनी आत्महत्या केली. यापुढे कर्ज वसुलीसाठी तगादा लावला, तर बॅँकांना हिसका दाखवू, असा इशारा पाटील यांनी दिला.