लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राबविलेल्या ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ या उपक्रमामध्ये सातवा वेतन आयोग, अनुकंपा, सेवानिवृत्तीवेतन आदी विविध स्वरूपातील ३,०३४ प्रकरणे सोमवारी मार्गी लागली. त्यातील २,७६४ प्रकरणे उपक्रम सुरू होण्यापूर्वी, तर २७० प्रकरणे दिवसभरात निकाली निघाली. अनुकंपा तत्त्वावरील सात जणांना नियुक्तीचे आदेश देण्यात आले. शासनमान्य ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या खात्यावर जमा करण्याचा आणि त्यांना ओळखपत्र देण्याच्या योजनेचा प्रारंभ करण्यात आला. या उपक्रमाच्या माध्यमातून मंत्री सामंत यांनी ‘उच्च शिक्षण मंत्रालय आपल्या दारी’ या राज्यस्तरीय उपक्रमाची सुरुवात केली.
शिवाजी विद्यापीठातील राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात सकाळी अकरा ते सायंकाळी साडेपाच यावेळेत ‘उच्च व तंत्रशिक्षण मंत्रालय @ कोल्हापूर’ उपक्रम राबविण्यात आला. उच्च शिक्षण क्षेत्रातील विविध घटकांच्या समस्या सोडविण्यासाठीच्या या उपक्रमासाठी मंत्री सामंत यांच्यासह उच्च शिक्षण विभागाचे प्रधान सचिव ओ. पी. गुप्ता, संचालक डॉ. धनराज माने, राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाचे आयुक्त चिंतामणी जोशी, ग्रंथालय संचालनालयाच्या संचालक डॉ. शालिनी इंगोले, कला संचालनालयाचे संचालक डॉ. राजीव मिश्रा, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के, खासदार संजय मंडलिक, धैर्यशील माने, आमदार ऋतुराज पाटील, जयंत आसगावकर, प्रकाश आबिटकर उपस्थित होते. या उपक्रमासाठी ऑनलाइन स्वरूपात ९०० निवेदने सादर झाली होती. निवेदने सादर केलेल्या व्यक्ती, संस्था दिलेल्या टोकन क्रमांकानुसार व्यासपीठावर येऊन प्रश्न, समस्या मांडत होत्या. त्या समजून घेऊन त्यांच्या निवेदनावर मंत्री सामंत हे त्याबाबत पुढील कार्यवाहीचा शेरा नोंदवून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देत होते. पाच तास चाललेल्या या उपक्रमात ३९४ जणांनी प्रत्यक्षात प्रश्न मांडले. अजिनाथ दडस, सुमीत चव्हाण, जयश्री कौलापुरे, अक्षय शिंदे, चिंतामणी कोरे, सूरज शिंदे, विजय सिताप यांना अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती आदेशाची पत्रे देण्यात आली. आर. बी. माडखोलकर महाविद्यालय (चंदगड), म्हैशाळ महाविद्यालय (मिरज), कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (उमदी) येथे मुक्त विद्यापीठाची अभ्यास केंद्रे सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.