कोपार्डे : एक वर्षापूर्वी फेसबुकवर झाली ओळख. ओळखीचे झाले प्रेमात रूपांतर.आणि पनवेलच्या युवतीने गाठले थेट कोपार्डे. मुलांच्या घरच्यांनीही लग्नाची तयारी सुरू झाली. पण मुलीची आई पनवेल पोलिसांसह करवीर पोलिसांना घेऊन कोपार्डे येथे मुलांच्या दारात हजर राहताच घरच्यांची बोबडी वळली.ही कथा नाही तर सत्य वस्तुस्थिती आहे. घडले ते असे एक वर्षापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून पनवेल(मुंबई)येथील १६ वर्षीय मुलीचे फेसबुकच्या माध्यमातून कोपार्डे येथील तरूणाशी ओळख झाली. गेली वर्षभर दोघांची समोरा समोर भेट झाली नसतानाही प्रेमाचे अंकुर मात्र फेसबुकच्या माध्यमातून उमलू लागले. मुलीने मागचापुढचा विचार न करता कोपार्डे येथील तरुणाचे घर गाठले.आठ दिवसापूर्वी ती कोपार्डे येथे आली होती अशिक्षित आईवडिलांनी मुलांच्या प्रेमा खातर लग्नाची तयारी सुरू केली.दारात मुहूर्तमेढ रोवण्यात आली. गावात या फेसबुक प्रेमाची चर्चा रंगू लागली.आतुरतेने ग्रामस्थांत प्रत्येक कट्ट्यावर चर्चा सुरू झाली. दोनच दिवसात लग्नाचा मुहूर्त ठरवण्यात आला.तो पर्यंत रविवारी दुपारी मुलीची आई पनवेल व करवीर पोलिसांना घेऊन या तरुणाच्या दारात आल्यानंतर घटनेचे गांभीर्य समोर आले.मुलगा-मुलगी दोघेही अल्पवयीन. मुलगीने आपणहून कोपार्डे येथे आल्याचे सांगितले तरी तरूण व त्यांचे आईवडील कायद्याच्या कचाट्यात अडकणार असल्याचे समजताच त्यांची बोबडीच वळली. गावातील लोकांनी आईवडील अशिक्षित व गरीब आहेत अशी विनवणी करण्यास सुरू केली. पण मुलगा व मुलगीला हजर करा त्या शिवाय पोलीस बोलायला तयार होईनात.मुलगीला हजर केले आणि मुलग्याला घेऊन येतो असे सांगताच पोलिसांनी खाक्या दाखवत मुलग्याच्या वडीलांना ताब्यात घेऊन थेट करवीर पोलीस ठाण्यात घेऊन गेले. यामुळे या फेसबुक प्रेमी विवाहाची लग्नाआधीच वरात पालकांच्यासह पोलीस ठाण्याच्या दारात वरात गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. चौकशी अंती मुलगीला पनवेल पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
Kolhapur: फेसबुकवरून जुळले सुत; लग्नाची तयारी सुरू झाली, पोलिस दारात येताच घरच्यांची बोबडी वळली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2023 4:03 PM