सांगली : मिरजेतील रेशन व रॉकेल दुकानदार अभिजित पाटील यांच्या घरावर आयकर अधिकारी असल्याची बतावणी करून दरोडा टाकणाऱ्या दहाजणांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्याखाली कारवाई केली आहे, अशी माहिती जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत आठ टोळ्यांतील ५९ गुन्हेगारांना मोक्का लावण्यात आला आहे. ‘मोक्का’ लागलेल्यांत धोंडिराम शिंदे (वय ३२), संतोष कोळी (२६), उमेद शेख (२३), नितीन पारधी (२९, चौघे रा. खडकवासला), राहुल माने (२२, मिरज), रणजित रजपूत (२६, पिलीव, जि. सोलापूर), गोट्या शेलार (२५, नांदोशी, जि. पुणे), अरीफ शेख (२६, पुणे), संतोष तुकाराम गाडेकर (२१, हडपसर), गणेश गोरख भिसे (२८, अण्णा भाऊ साठेनगर, पुणे) यांचा समावेश आहे. यातील धोंडिराम शिंदे हा टोळीचा म्होरक्या आहे. यापूर्वी सातारा पोलिसांनी त्याला ‘मोक्का’ लावला होता. त्यातून जामिनावर बाहेर आल्यानंतर त्याने नवीन टोळी तयार करून दरोडे व लूटमारीचे गुन्हे सुरू केले होते. मिरजेतील राहुल माने टोळीच्या संपर्कात होता. त्याने अभिजित ऊर्फ आबा पाटील यांच्या घरावर दरोडा टाकण्याची ‘टीप’ दिली होती. (प्रतिनिधी)
मिरज दरोड्यातील टोळीस ‘मोक्का’
By admin | Published: April 16, 2015 10:57 PM