शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

मिरज : सर वॉन्लेस ते कोरोना!

By वसंत भोसले | Published: April 14, 2020 5:44 PM

मिरज शहराचे नाव उच्चारताच मिशन हॉस्पिटल, हॉस्पिटलांचे गाव, रेल्वे जंक्शन, दर्गा, अंबाबाई देवस्थान असे बरेच काही आठवायला लागते. सव्वाशे वर्षांची रुग्णसेवेची परंपरा आणि कोरड्या हवेमुळे अनेक आधुनिक हॉस्पिटल स्थापन झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत प्रसिद्ध असलेले शहर आहे. शिवाय या शहरात सर्व जाती-धर्मांचे लोक मोठ्या संख्येने राहत असल्याने सर्वधर्मसमभाव या सौहार्दाच्या वातावरणाचाही प्रत्यय वारंवार येतो.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर याच मिरजेत आता तपासणी केंद्र झाले आहे. त्यातून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, कोकण व गोवा जोडला जात आहे. सर वॉन्लेस यांच्या स्मृतीस अभिवादन!

- वसंत भोसले-

मिरज शहराचे नाव उच्चारताच मिशन हॉस्पिटल, हॉस्पिटलांचे गाव, रेल्वे जंक्शन, दर्गा, अंबाबाई देवस्थान असे बरेच काही आठवायला लागते. सव्वाशे वर्षांची रुग्णसेवेची परंपरा आणि कोरड्या हवेमुळे अनेक आधुनिक हॉस्पिटल स्थापन झाल्याने महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या राज्यांत प्रसिद्ध असलेले शहर आहे. शिवाय या शहरात सर्व जाती-धर्मांचे लोक मोठ्या संख्येने राहत असल्याने सर्वधर्मसमभाव या सौहार्दाच्या वातावरणाचाही प्रत्यय वारंवार येतो.

नवरात्रीत अंबाबाईदेवीच्या जागरानिमित्त होणारी संगीत मैफल किंवा दर्गाच्या उरुसासाठी अब्दुल करीम खाँ साहेबांच्या स्मरणार्थ होणारी तीन दिवसांची संगीत सेवा अशा अनेक वैशिष्ट्यांनी मिरजेचा इतिहास भरभरून वाहतो आहे. अशा या ऐतिहासिक नगरीच्या वैद्यकीय सेवेची परंपरा अखंड वाहत आहे. जगभरआलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गातही मिरजेचे नाव पुन्हा ठळकपणे कोरले जात आहे. महाराष्ट्रात जी काही कोरोना विषाणू तपासणीची केंदे्र झाली त्यात मिरजेचे केंद्र महत्त्वाची भूमिका पार पाडत आहे.

कृष्णा नदीच्या काठापासून बाजूला वसलेल्या मिरज शहराला सुमारे बाराशे वर्षांचा इतिहास आहे. उत्तर भारत आणि दक्षिण भारताला जोडणाऱ्या मध्य पठारावरील हे शहर आहे. दक्षिणेत जाण्यासाठी मिरज महत्त्वाचे केंद्र म्हणून मानले जाते. छत्रपती शिवाजी महाराज दक्षिणेच्या स्वारीवर जाताना सुमारे दोन महिने मिरजेत राहिले होते. विजापूरच्या आदिलशाहबरोबर तेव्हा संघर्षही झाला होता. पेशवाईमध्ये मिरजेचे संस्थान पटवर्धनांना जहागिरी म्हणून दिले आहे. पटवर्धनांचे संस्थान उभे राहिले. भारतात ब्रिटिशांचे राज्य स्थापन होऊन अस्ताला जाईपर्यंत हे संस्थान होते. ८ मार्च १९४८ रोजी हे संस्थान खालसा होऊन स्वतंत्र भारताचे भाग बनले. दरम्यानच्या काळात एक मिशनरी कॅनडातून आला व मिरजेत वैद्यकीय सेवेचे रोपटे लावले. त्यांचे नाव होते सर विल्यम जेम्स वॉन्लेस ! १ मे १८६५ रोजी कॅनडातील अ‍ॅन्टारिओ प्रांतातील कलेडॉन गावात जन्मलेले सर वॉन्लेस यांनी आपले उच्चशिक्षण अमेरिकेत पूर्ण केले.

न्यूयॉर्क युनिव्हर्सिटी स्कूल आॅफ मेडिसीनमधून शल्यचिकित्सक म्हणून पदवी घेऊन बाहेर पडलेले ऐन तारुण्यातील सर वॉन्लेस यांनी मिशनरी मोहिमेवर लोककल्याणार्थ काम करण्याचे ठरवून भारतात येण्याचा निर्णय घेतला. वयाच्या पंचविसाव्या वर्षी मेरी या परिचारिकेशी विवाह करून नोव्हेंबर १८८९ मध्ये ते भारतात आले. त्यांनी मिरज या शहराची निवड केली. तेव्हा अठरा हजार लोकवस्तीचे हे शहर स्वच्छ कोरडी हवा आणि रस्ते, रेल्वेने जोडले गेलेले होते.

कृष्णा आणि वारणा नद्यांचे पाणी मुबलक होते. ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या सदर्न मराठा रेल्वेने १८८७ मध्ये दक्षिणेला जोडणारी रेल्वेलाईन टाकण्यास सुरुवात केली. पुण्याच्या खालोखाल महत्त्वाचे रेल्वे जंक्शन म्हणून मिरजेला स्थान मिळाले. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा तसेच कोकणाच्या भागाला जोडणारे रस्ते होते. सर वॉन्लेस यांनी मिरजेची निवड करून आपली पत्नी मेरी यांच्या मदतीने एका भाड्याच्या खोलीत डिस्पेन्सरी सुरू केली. उच्चशिक्षित असल्यानेसर वॉन्लेस अल्पावधीतच नावारूपास आले. मिरजेचे संस्थानिक गंगाधरराव पटवर्धन ऊर्फ बाळासाहेब यांनी त्यांना मोठे हॉस्पिटल बांधण्यासाठी मदतीचा हात पुढे केला आणि संस्थानाकडील मोठी जागा देऊ केली.

तत्पूर्वी, डॉ. गोपाळराव गोविंदराव वाटवे हे मिरजेतील पहिले डॉक्टर होते. त्यांच्या मदतीने १८६४ मध्ये पहिले रुग्णालय श्रीमंत पटवर्धन यांनी सुरू केले होते. मिशन हॉस्पिटल नावाने २५० खाटांचे भव्य हॉस्पिटल उभे राहिले. त्याला आता १२६ वर्षे झाली. सर वॉन्लेस यांनी मिशन हॉस्पिटलच्या उभारणीबरोबरच मिरजेची आरोग्यासाठी असलेली स्वच्छ हवा, पाणी आदींचा अभ्यास करून क्षयरोग (१९२०) तसेच कुष्ठरोग्यांवर (१९२८) उपचार करण्यासाठी हॉस्पिटल्स उभारली. रेल्वे आणि रस्त्यांच्या सोयीमुळे पार मराठवाड्यापासून गोव्यापर्यंतच्या रुग्णांना याचा लाभ मिळू लागला. उत्तर कर्नाटक आणि पश्चिम महाराष्ट्रासाठी तर प्रमुख हॉस्पिटल शहर म्हणून मिरजेचा नावलौकिक झाला. सर वॉन्लेस यांनी सलग सदतीस वर्षे आरोग्य सेवा दिली. या दरम्यान पत्नी मेरी यांचे १२ आॅगस्ट १९०६ रोजी मिरजेतच निधन झाले. त्यांनी विलियान इमेरी हॅव्हेन्स यांच्याशी वारणा-कोडोली येथे दुसरा विवाह केला. मिशन हॉस्पिटलला नावारूपास आणून रुग्णांची अखंड सेवा करताना मेडिकल स्कूल, नर्सिंग स्कूल, आदी शिक्षण संस्थांही त्यांनी सुरू केल्या. पत्नी मेरी यांच्या स्मरणार्थ मेरी वॉन्लेस हॉस्पिटलची स्थापना केली. आपल्या निवृत्तीनंतर पत्नी मिसेस हॅव्हेन्स यांच्यासोबत तीन मुलांसह ते अमेरिकेतील कॅलिफोर्नियामध्ये स्थायिक झाले. ३ मार्च १९३३ रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या पत्नीने अनेक आठवणी लिहून ठेवल्या आहेत. वयाच्या ९९व्या वर्षी त्यांचे १९७३ मध्ये निधन झाले.

कॅनडामध्ये जन्म, अमेरिकेत शिक्षण आणि भारतात सुमारे चाळीस वर्षे रुग्णांची सेवा करून एक मोठी परंपरा मिरजेत निर्माण केली. मिरजेशी संलग्न असणा-या उत्तर कर्नाटक, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण आणि गोव्यातील लोकांचे एक महत्त्वाचे आरोग्य केंद्र म्हणून मिशन हॉस्पिटलचा नावलौकिक आहे. या सर्व परिसरातील गावोगावी मिरज मिशन हॉस्पिटलला पेशंट घेऊन गेलेत याचा अर्थ काही तरी मोठा आजार असणार असे मानले जात होते. गरीब, गरजू आणि जात-धर्म भेदाभेद न करता या मिशन हॉस्पिटलने शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षापर्यंत अखंड सेवा दिली आहे. एवढेच नव्हे तर या हॉस्पिटलमुळे मिरज आणि नंतरच्या काळात सांगलीला असंख्य हॉस्पिटल्स उभी राहिली. आज एका मिरज शहरात १३० हॉस्पिटल्स आहेत.

तितकीच सांगली आणि परिसरात असतील. एका मिशन हॉस्पिटलमुळे ही परंपरा तयार झाली. चेस्ट हॉस्पिटल, मेरी वॉन्लेस हॉस्पिटल, आदी त्यांनी उभी केलीच, पण पुढेही स्वातंत्र्योत्तर काळात परंपरा विस्तारित गेली. मिरजेतच राज्य शासनाने वैद्यकीय महाविद्यालय स्थापन केले. त्याचे उद्घाटन ३१ जुलै १९६२ रोजी तत्कालीन संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. आज महाविद्यालयात एमबीबीएसच्या २०० जागा आहेत व एमडीच्या ४७ जागा आहेत. अनेक विद्यार्थ्यांच्या पिढ्या या महाविद्यालयात शिकून बाहेर पडल्या आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सातारा किंवा सांगली या मोठ्या शहरांपेक्षा मिरजेला महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर पहिला मान मिळाला. हॉस्पिटल्सबरोबरच डॉक्टर घडविणारे एक प्रमुख केंद्र मिरजेत उभे राहिले. याच वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात सुसज्ज असे कोरोना विषाणू तपासणी केंद्र आज उभे राहिले आहे. त्याच्या प्रमुख म्हणून डॉ. पल्लवी सापळे यांची विशेष नियुक्ती झाली आहे.मिशन हॉस्पिटलमुळे मिरजेचा नावलौकिक झाला तसे अनेक खासगी रुग्णालये आणि ख्यातनाम डॉक्टर्सनी मिरजेच्या या परंपरेत मोलाची भर घातली. असंख्य नावे सांगता येतील असे ख्यातनाम डॉक्टर आहेत. डॉ. आनंदराव गायकवाड, डॉ. दत्तात्रय प्राणी, डॉ. शिवरामपंत बडबडे, डॉ. डी. के. गोसावी, डॉ. एन. आर. पाठक, डॉ. एस. व्ही. सोरटूर, डॉ. जी. एस. कुलकर्णी, डॉ. रियाज मुजावर, डॉ. चार्ल्स व्हेल, डॉ. चारुदत्त, डॉ. फेल्चर, डॉ. ब्रिजमोहन देबशीकदार, डॉ. भोजराज चिडगुपकर, आदी अनेकांची नावे घेता येतील. अलीकडील काळात डॉ. तुषार धोपाटे, डॉ. रविकांत पाटील, डॉ. विनोद परमशेट्टी, डॉ. मुकुंद, डॉ. दयानंद नाईक, डॉ. रवींद्र जोशी, डॉ. नॅथनियल ससे, डॉ. राजीव गांधी, आदी तरुण काम करीत आहेत.

हॉस्पिटल्सबरोबर वैद्यकीय शिक्षणाचाही विस्तार झाला. गुलाबराव पाटील ट्रस्टने होमिओपॅथी कॉलेज, नर्सिंग कॉलेज स्थापन केले. डॉ. पतंगराव कदम यांनी ८ जानेवारी २००५ रोजी सांगली-मिरज रस्त्यावर वॉन्लेसवाडीला भारती हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभे केले. केवळ पंधरा वर्षांत या महाविद्यालयाने नाव कमावले आहे. डॉ. ब्रिजमोहन देबशीकदार हे बंगाली गृहस्थ होते. पश्चिम बंगालमधून येथे येऊन त्यांनी मानसिक संतुलन बिघडलेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी ‘कृपामायी’ रुग्णालय उभारले. डॉ. डी. के. गोसावी यांनी अपार कष्टातून आणि अनेकांची मदत घेत याच रस्त्यावर कॅन्सर हॉस्पिटल उभे केले. मिरजेला सुसज्ज कॅन्सर हॉस्पिटल नव्हते. डॉ. सोरटूर यांची कीर्ती सर्वदूर आहे. वयाची ऐंशी वर्षे पार केलेले डॉ. सोरटूर मूळचे म्हैसूरचे. ते येथे मिशन हॉस्पिटलमध्ये काम करण्यास आले आणि मिरजकर होऊन गेले. डॉ. जी. एस. कुलकर्णी यांचा अर्थोपेडिकमध्ये असाच नावलौकिक आहे. डॉ. रविकांत पाटील यांनी आपले उत्तम हॉस्पिटल उभारले आहे. डॉ. ससे यांनी आता तर वॉन्लेस यांची परंपरा चालविली आहे. मिशन हॉस्पिटलचे नाव आता ‘सर वॉन्लेस हॉस्पिटल’ आहे. त्याचे संचालकआहेत आणि मेंंदू विकारतज्ज्ञ म्हणून ख्यातनाम आहेत. सांगली-मिरजेच्या वैद्यकीय व्यवसायाचे आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे या सेवेचे पूर्ण व्यावसायिकीकरण झालेले नाही. आरोग्यसेवेचा जो एक सेवाभाव असतो, तो आजही सांभाळून व्यवसाय केला जातो आहे. त्यामुळे उत्तम डॉक्टर व त्यांना सल्ला देणारे म्हणून  असंख्यजण प्रसिद्ध आहेत. अलीकडच्या काळात बेळगाव, विजापूर, कोल्हापूर, कºहाड आणि सोलापूरयेथेही अनेक हॉस्पिटल्स झाली. मेडिकल कॉलेजीस झालीत, पण सांगली-मिरजेची पंरपरा अबाधित राहिली.

डॉ. एन. आर. पाठक यांनी तर एक वेगळाच इतिहास रचला. हे गृहस्थ सेवार्थी रुग्ण पाहण्यात आघाडीवर होते. ते मिरज परिसरात आठवडी बाजारात आठवडी ओपीडी चालवत. गाडीत दोन स्टूल घेऊन औषधांसह आठवडी बाजारात जाऊन पेशंट तपासत असत. तेदेखील मोफत! आरग, बेडग, बेळंकी, सलगरे, भोसे, टाकळी, बोलवाड, म्हैशाळ आदी मोठ्या गावांच्या आठवडा बाजारात ते आपली गाडी रस्त्याकडेला लावून आरोग्यसेवा देत. एका स्टूलवर डॉक्टर आणि समोरच्या स्टूलवर पेशंट बसलेला, हा तो काळ होता. १९६७ मध्ये पुण्याहून मिरजेकडे येणाऱ्या आणि कोल्हापूरकडे जाणाºया रेल्वे लाईनचे ब्रॉडगेज करण्यात येणार होते. तेव्हा सांगलीला रेल्वे जात नव्हती.

पुण्याहून ताकारीमार्गे माधवनगरहून थेट मिरजेला येत असे. सांगली-मिरज दरम्यान शटल सेवा रेल्वे होती. तत्कालीन ताकदवार नेते वसंतदादा पाटील यांनी माधवनगरऐवजी सांगलीमार्गे मिरजेला रेल्वे मार्ग आखण्याचा आग्रह धरला. तो १९६९ मध्ये पूर्णही झाला, पण मिरजेचे जंक्शन म्हणून जे स्थान होते ते सांगलीला जाणार असा प्रचार झाला आणि डॉ. एन. आर. पाठक या ख्यातनाम डॉक्टरांनी त्याला विरोध करीत जनमत संघटित केले. १९६७च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी या मुद्द्यावर मिरजेवर अन्याय होता कामा नये, अशी भूमिका घेतली. काँग्रेसचा प्रचंड दबदबा असताना डॉ. एन. आर. पाठक यांनी अपक्ष निवडणूक लढविली आणि काँग्रेसचे उमेदवार बापूसाहेब जामकर यांचा पराभव केला. एका सेवाभावी डॉक्टरांचा असाही राजकीय प्रवेश झाला होता. त्यांनी आपल्या आमदारकीच्या काळात मिरजेचे अनेक प्रश्न मार्गी लावले.

मिरजेत हिंदू, दलित, ख्रिश्चन, मुस्लिम, लिंगायत इतर बहुजन वर्ग जवळपास सारखाच, पण बहुसंख्येने आहे. फुटबॉल स्पर्धा तसेच गणेशोत्सव, उरुस, मोहरम, शिवजयंती, आंबेडकर जयंती, ख्रिसमस आदी सण मोठ्या आनंदाने सर्वजण साजरे करतात. एका वैशिष्ट्यपूर्ण शहराला हॉस्पिटल सिटीचे रूप देण्याचे रोपटे सर विल्यम जेम्स वॉन्लेस यांनी १२६ वर्षांपूर्वी लावले आणि ते सेवेचे कार्य अखंडपणे चालू आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर याच मिरजेत आता तपासणी केंद्र झाले आहे. त्यातून पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्रासह उत्तर कर्नाटक, कोकण व गोवा जोडला जात आहे. सर वॉन्लेस यांच्या स्मृतीस अभिवादन!