चंदगड :
चंदगड तालुक्याच्या पश्चिमेकडील शेवटचे गाव असलेल्या मिरवेल येथील प्राथमिक शाळेला वर्षभरापासून शिक्षण विभागाने शिक्षकच दिला नसल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तसेच शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.
किल्ले पारगडच्या पायथ्याशी असलेल्या मिरवेल गावी जिल्हा परिषदेची चौथीपर्यंतची प्राथमिक शाळा आहे. ५ मुलेे या शाळेत शिक्षण घेतात. शासनाने बालकांचा शिक्षणाचा मोफत हक्क, सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राथमिक शिक्षणामध्ये बदल करण्याचे प्रयत्न केले.
मात्र, दुर्गम भागातील शाळेत शिक्षकांची रिक्त पदे भरताना चालढकल सुरू आहे. त्यामुळे मिरवेलसह तालुक्यातील शाळांमध्ये रिक्त असलेली शिक्षकांची पदे तात्काळ भरावीत, अशी मागणी पालकवर्गातून होत आहे. तिलारीजवळील नगरगाव या शाळेतही वर्षभरापासून शिक्षक नसल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याची पालकांची तक्रार आहे.
------
* प्रतिक्रिया
मिरवेल गावात शासनाची प्राथमिक शाळा आहे. इमारत, किचन शेड, शौचालय आदी सुविधा आहेत. मात्र, शिक्षक नाहीत. २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट दिवशी ध्वज फडकवायला स्वत:ला जावे लागत आहे. त्यामुळे या शाळेला ध्वज फडकवायला तरी शिक्षक द्यावा.
- संतोष पवार, सरपंच, पारगड-मिरवेल-नामखोल ग्रुप ग्रामपंचायत.