कोल्हापूर : गडहिंग्लज पंचायत समितीच्या शिक्षण विभागामध्ये २३ लाख ६७ हजार रुपयांचा अपहार झाल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याबाबतच्या द्विसदस्यीय चौकशी समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन यांना शुक्रवारी सादर केला. यामध्ये अपहाराची रक्कम स्पष्ट करण्यात आली आहे. या प्रकरणी आधीच वरिष्ठ सहायक दयानंद पाटील याला निलंबित करण्यात आले आहे.अशा पद्धतीचा अपहार झाल्याचे पत्र गटशिक्षणाधिकारी हलबागोळ यांनी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पाठवले होते. यामध्ये पाटील यांचे नाव पुढे आल्याने त्यांना तातडीने निलंबित करून शाहूवाडी पंचायत समिती मुख्यालय देण्यात आले. यानंतर कार्तिकेयन यांनी उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी अरुणा हसबे आणि उपशिक्षणाधिकारी बी. डी. टोणपे यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. या दोघांनीही गेल्या १५ दिवसांत चौकशी करून अहवाल शुक्रवारी सादर केला. या चौकशीमध्ये पाटील यांनी २३ लाख ६७ हजार ९७ रुपयांची रक्कम स्वतःच्या खात्यावर वर्ग करून अपहार केला असल्याचे स्पष्ट झाले आहे.आता वेतनासह अन्य रक्कम ऑनलाइन संबंधितांच्या खात्यावर वर्ग केली जात असताना या प्रक्रियेतील टॅब ओपन करून देणे या प्रक्रियेवर नियंत्रण असण्याची गरज चौकशी समितीने व्यक्त केली आहे. त्यानुसार काही सुधारणाही समितीने सुचवल्या आहेत.
आता वसुलीचे आव्हानअपहारित रक्कम दयानंद पाटील याच्याकडून वसूल करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या प्रशासनासमोर आहे. कारण शासनाकडून कोरोनाकाळात आलेले जादा पैसे आपल्यासह अन्य काहीजणांच्या खात्यावर वर्ग करून हा अपहार करण्यात आला आहे. त्यामुळे यातील बहुतांश रक्कम पाटील याच्याच खात्यावर वर्ग झाल्याने त्याच्याकडून आता वसुली करण्याची प्रक्रिया आता सुरू होणार आहे.
चौकशीमध्ये २३ लाख ६७ हजार रुपयांचा घोटाळा झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा चौकशी अहवाल शुक्रवारी सायंकाळी माझ्याकडे सादर केला आहे. या अहवालानुसार संबंधित दोषींवर कारवाई करण्याच्या सूचना सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांना सोमवारी देणार आहे. तसेच गडहिंग्लज पंचायत समितीकडे यापूर्वी झालेल्या कामांचीही सखोल चौकशी करणार आहे. - एस. कार्तिकेयन, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, कोल्हापूर