रत्नागिरी : जिल्हा शासकीय रुग्णालयाला भूलतज्ज्ञ मिळाला खरा, पण तोही काही दिवसातच गायब झाल्याने जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञाची वानवा कायम आहे. भूलतज्ज्ञाविना सध्या रुग्णांची परवड होत असून, त्यामुळे शस्त्रक्रियेसाठी येणाऱ्या महिला तसेच रुग्णांना कोल्हापूर गाठावे लागत आहे.जिल्हा रुग्णालयात सर्वसामान्य रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी येतात. मात्र, डॉक्टरांची रिक्त पदे, तर काही डॉक्टर्सकडून कर्तव्यात होणारी टाळाटाळ यामुळे रुग्णांना म्हणावी तशी सेवा मिळत नाही. गेले काही महिने जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञाचा विषय चर्चेत आहे.भूलतज्ज्ञाअभावी जनतेची होणारी गैरसोय कानावर आल्याने प्रशासनाने परजिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची आळीपाळीने नियुक्ती केली. शासनाने तसे परिपत्रकही प्रसिद्ध केले. एवढेच नव्हे; तर या ठिकाणी येण्यास टाळाटाळ केल्यास प्रशासकीय कारवाई करण्याचा इशारा कोल्हापूर येथील आरोग्य उपसंचालकांनी दिला होता. मात्र, या सर्वांवर भूलतज्ज्ञांनी कुरघोडी केली आहे. काही दिवस येण्याचे नाटक करुन भूलतज्ज्ञ पुन्हा गायब झाल्याने जनतेची ओरड सुरुच आहे, तर जिल्हा रुग्णालयातील भूलतज्ज्ञाची जागाही रिक्त आहे. सध्या लेप्टो, डेंग्यू, मलेरिया आदींच्या साथीचे रुग्ण जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. प्रसुतीसाठी आलेल्या महिलांनाही भूलतज्ज्ञ नसल्याने विविध गैरसोर्इंना सामोरे जावे लागले. आयत्यावेळी भूलतज्ज्ञ न आल्याने सोमवारपर्यंत प्रसुतीसाठी आलेल्या महिलांना कोल्हापूर येथे हलविण्यात आले. शस्त्रक्रियेसाठी आलेले व अपघातात जखमी झालेल्या रुग्णांनाही भूलतज्ज्ञाअभावी कोल्हापूर येथे हलवण्याची वेळ आली आहे. आरोग्य उपसंचालकांच्या आदेशालाही वाटाण्याच्या अक्षता लावणाऱ्या भूलतज्ज्ञांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)नियुक्त भूलतज्ज्ञ...१८ ते २५ आॅक्टोबर या कालावधीत कोल्हापुरातील हातकणंगले तालुक्यातील पारगाव ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. प्रशांत कुंडलिक म्हसवेकर हे रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सेवा बजावणार होते. मात्र, त्यांनी काही दिवसच सेवा बजावली, त्यानंतर ते गायब झाले.२६ आॅक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत हातकणंगले ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. श्रीधर सुबराव वाघ हे कार्यरत होणार होते. मात्र, काही दिवस राहून तेही गायब झाले.३ ते १० नोव्हेंबर या कालावधीत पन्हाळा ग्रामीण रुग्णालयाच्या डॉ. स्नेहल मोहन वटकर येथे सेवा बजावणार होत्या. मात्र, त्यासुद्धा सोमवारी हजर न झाल्याने शस्त्रक्रियेसाठी बोलावलेल्या रुग्णांची गैरसोय झाली.
भूलतज्ज्ञ गायब, रुग्णांचे मात्र हाल
By admin | Published: November 05, 2014 10:29 PM