कोल्हापूर : महिला व बालविकास विभागाच्या वतीने जिजामाता किंवा जिजाऊ अशी कोणतीही योजना राबविली जात नसून या मेसेजला नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.डी. शिंदे यांनी सोमवारी केले आहे.
ज्या घरातील २१ ते ७० या वयोगटातील कर्त्या व्यक्तीचे निधन १ मार्च २०२० ते २८ फेब्रुवारी २०२१ या कालावधीत कोरोनामुळे झाले आहे, अशा विधवा महिलांना महिला व बालविकास विभागाच्या जिजामाता, जिजाऊ या योजनेंतर्गत ५० हजार रुपये प्रतिलाभार्थी मिळतील, अशी पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही पोस्ट खोटी व बनावट असून, अशा प्रकारची कोणतीही योजना महिला व बालविकास विभागामार्फत कार्यान्वित नाही, असे विभागाने स्पष्ट केले आहे.
---