छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचे परिपत्रक
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबा बावडा: छत्रपती राजाराम साखर कारखान्याच्या अपात्र सभासदांना उच्च न्यायालयाचा दिलासा या सदराखाली कारखान्याकडून प्रसिद्ध करण्यात आलेले वृत्त निराधार असून, कारखान्याच्या सुज्ञ सभासदांची दिशाभूल करणारे आहे. असे पत्रक राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीच्या वतीने माजी नगरसेवक मोहन सालपे यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, आमच्या आघाडीच्या वतीने मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांच्याकडे कारखान्याच्या सभासदांपैकी आवश्यक पात्रता धारण करत नसलेल्या १,८९९ सभासदांचे सभासदत्वाबाबत तक्रार करण्यात आली होती. या कामी मा. प्रादेशिक सहसंचालक (साखर), कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी या सर्व सभासदांच्या कागदपत्रांची महसूल यंत्रणेमार्फत छाननी केली व त्यामधील अपात्र १,००८ व कार्य क्षेत्राबाहेरील ३३८ असे एकूण १,३४६ सभासद अपात्र ठरवून त्याबाबतचा आदेश दिनांक १४ फेब्रुवारी, २०२० रोजी दिला.
या १,३४६ सभासदांच्या अपात्रतेबाबतच्या आदेशावर कारखान्याने मा. सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्याकडे अपील दाखल केले आहे. सदरचे अपील अजूनही मा. सहकारमंत्री, महाराष्ट्र राज्य यांच्या स्तरावर प्रलंबित आहे.
माननीय प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर यांनी पूर्ण चौकशी अंती हे १,३४६ सभासद अपात्र केलेले आहेत. त्यांना कोणताही दिलासा देण्याचा प्रश्न नसताना कारखाना प्रशासनाकडून चुकीचे वृत्त दिले आहे. त्यावर स्वाभिमानी सभासदांनी विश्वास ठेवू नये.
सदर अपिलाचा निर्णय लवकर व्हावा म्हणून कारखान्याने या अपात्र सभासदांचे वतीने मे. उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेमध्ये दिनांक १४ जानेवारी २०२१ रोजी उच्च न्यायालयाने आदेश देऊन मा. सहकार मंत्री, महाराष्ट्र राज्य, यांनी या अपिलाचा निर्णय चार आठवड्यात द्यावा, असे निर्देश दिले आहेत. यामध्ये अपात्र केलेल्या सभासदांचे अपात्रतेला कोणतीही स्थगिती दिलेली नाही, असेही मोहन सालपे यांनी पत्रकात शेवटी नमूद केले आहे.