लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : नवविवाहितांनी आषाढात पती आणि सासूचे तोंड न बघण्याची प्रथा आहे. यानिमित्ताने नवीन सुनेला माहेरपणाचा आनंद मिळतो. सासर माहेरच्या गप्पागोष्टी होतात. पण यंदा कोरोनामुळे या परंपरेला मुरड घालत नवविवाहितांना माहेरची वारी टाळावी लागली आहे. माझ्या माहेराच्या वाटे जरी लागल्या रे ठेचा, वाटेवरच्या दगडा तुला फुटेल का रे वाचा.. अशी त्यांची स्थिती झाली आहे.
नवीन लग्न झालेल्या मुलींनी आषाढ महिन्यात नवऱ्याचे तसेच सासूचे तोंड बघू नये अशी आपल्याकडे परंपरा आहे. त्यामुळे अगदी पाच दिवसांपासून ते महिनाभर नवविवाहिता माहेरपणाचा आनंद घेत असतात. आषाढात पतीचे तोंड का बघू नये, ही प्रथा का पाळली जाते, याचे कारण काय विचारले असता जुन्या पिढीतील महिलांनाही ते सांगता आले नाही. आमच्या सासू-सासऱ्यांपासून, त्यांच्या आधीपासून हे चालत आले आहे. कारण माहिती नाही पण आम्ही ही प्रथा पाळतो असे उत्तर महिलांनी दिले. सून नवविवाहीत असो किंवा वर्षानुवर्षांचा संसार केलेली महिला असो माहेर म्हणजे तिच्या मनाचा हळवा कोपरा असतो. माहेरपणाचे सुख, निवांतक्षण, आई-वडील, भावंडांचा सहवास आणि सासर माहेरच्या गुजगोष्टींनी तिला नवी उभारी येते. यंदा मात्र कोरोनामुळे नवविवाहितांना माहेरपणाला जाता आलेले नाही आणि गेल्याच तर प्रथा पाळायची म्हणून सकाळी जाऊन संध्याकाळी परतावे लागले आहे.
----
लग्नाला सहा महिने झाले. माझे माहेर आळते (ता. हातकणंगले) येथील आहे. ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग जास्त आहे. त्यामुळे माहेरी राहायला जाता आले नाही. आषाढातली प्रथा पाळायची म्हणून सकाळी जाऊन संध्याकाळी परत यावे लागले. संसर्गाच्या भीतीने प्रवास करायचे धाडस होत नाही. आता कोरोना कमी झाल्यावरच जायला मिळेल.
सिद्धी कुरणे
आळते (ता. हातकणंगले)
---
माझ्या लग्नाला वर्ष होत आलेण आई-वडील मुरगुडला असतात. कोरोनामुळे गेले सहा महिने माहेरी गेलेले नाही. नाही तर एरवी एक दोन महिन्यात जाऊन दोन तीन दिवस राहून येत असते. फाेनवर मात्र सगळ्यांशी सतत संपर्क असतो.
दीपाली पाटील
मुरगूड (ता.कागल)
---
माझी मुलगी बेळगावला असतेण काेरोनामुळे गेल्या सात आठ महिन्यांत तिला माहेरी येताच आलेले नाही. तिची आठवण येतेचण फोनवर बोलणं होतंच पण भेटण्याची सर लांबून बोलण्याला येत नाही. कोरोना कमी झाल्यावर बसेस सुरू झाल्या तर भेट होईल.
मलप्रभा गावडे
पाचगांव (ता.करवीर)
---
माझी मुलगी बेळगावला असते. कर्नाटकात आणि इथे कोल्हापुरात पण कोरोना एवढा वाढलाय, त्यात बसेस बंद यामुळे तिला येताच आलेले नाही. व्हिडिओ कॉलवर बोलतो. सध्या तर तेवढ्यावरच समाधान मानावे लागणार आहे.
अपर्णा बेकवाडकर
मगदूम कॉलनी कोल्हापूर.
--
(कोरोना काळातील विवाहांची आकडेवारी स्वतंत्र पाठवते)