कोल्हापूर : भिक्षा मागणाऱ्या वेशातील दोघे तरुण शहरातून मुलांचे अपहरण करत असल्याची शनिवारी दुपारी अफवा पसरली. या गैरसमजातून शाहुपूरी परिसरातील शहाजी लॉ कॉलेज परिसरातून भगवी कपडे घालून फिरणाऱ्या या तरुणांना नागरिकांनी पकडून बेदम चोप दिला. त्यानंतर शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिस चौकशीत संबधित तरुण उत्तर प्रदेशातील जोगी समाजातील भिक्षुक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सोडून दिले. दरम्यान या घटनेने दिवसभर परिसरात भीती आणि तणाव निर्माण झाला.घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, राजारामपुरी पाचवी गल्ली परिसरात राहणारा एक चौदा वर्षीय मुलगा दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास लॉ कॉलेज चौकात आपल्या मित्राच्या दुकानात बसला होता. यावेळी या परिसरातून भगवी वस्त्र परिधान केलेले दोन भिक्षेकरी चालले होते. त्यांनी या मुलाला हाताने इशारा करुन बोलविल्याचा संशय काहींना आला. या परिसरातील रिक्षा व्यवसायिक मनोहर इंगवले यांना भिक्षेकरी मुलांचे अपहरण करणार असल्याचा संशय आला. त्यांनी ही माहिती आपल्या अन्य रिक्षाचालकांना दिली.
रिक्षाचालकांनी आणि नागरिकांनी आरडाओरडा केला. त्यांनी या संशयित दोघांना थांबवून चौकशी केली. त्यांना नावे विचारली असता, त्यांनी समीर आणि साहिल अशी नावे असल्याचे सांगितले. त्यांनी उत्तरप्रदेशातील असून भिक्षा मागण्यासाठी आल्याचे सांगितले. मात्र त्याच्या संशयास्पद वागण्यामुळे नागरिकांनी त्यांना बेदम चोप दिला.घडलेला प्रकार काहींनी शाहूपुरी पोलिसांना कळविला. त्या ठिकाणी पोलिस निरीक्षक अजयकुमार सिंदकर, सहायक फौजदार संदीप जाधव, बाबा ढाकणे, संदीप बेंद्रे, लखन पाटील हे घटनास्थळी पोहोचले. त्यांनी संतप्त झालेल्या जमावाला शांत करुन संशयित तरुणांना ताब्यात घेतले. त्यांच्यासह चौदा वर्षाचा मुलगा, रिक्षाचालकांनाही पोलिस ठाण्यात बोलावून घेतले. त्या वेळी त्या मुलाने आपले कोणीही अपहरण केले नसल्याचे सांगितले. त्यामुळे हा प्रकार गैरसमजूतीने झाल्याचे स्पष्ट झाले.