कोल्हापूर : नॅकचे सल्लागार जगन्नाथ पाटील यांना माझ्यापासून विभक्त व्हायचे असल्यानेच त्यांनी आपल्याच सात वर्षे वयाच्या लहानग्या मुलीचा टूल म्हणून वापर करीत माझ्यातील आईची बदनामी केली आहे. त्यांच्याकडून पदाचा व अवैध मार्गाने प्राप्त केलेल्या पैशाचा गैरवापर करून माझ्यावर व कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा आरोप पाटील यांच्या पत्नी प्रगती पाटील यांनी मंगळवारी कोल्हापुरात पत्रकार बैठकीत केला.
गेल्या आठवड्यात जगन्नाथ पाटील यांनी आईनेच मुलीचे अपहरण केल्याचा ‘माता न तू वैरिणी’ या नावाने व्हिडिओ समाजमाध्यमावर टाकला. यावरून बरीच चर्चा झाल्याने अखेर त्यांच्या पत्नी प्रगती पाटील यांनी पत्रकार बैठक घेऊन आपली भूमिका मांडली. त्या म्हणाल्या, आई कधीच वाईट नसते. १५ वर्षांचा संसार माेडण्याची माझीही अजिबात इच्छा नाही. दोन महिन्यांपूर्वी मी माहेरी निघून आले. मुलगी आशियानाला माझ्यासोबत पाठविले नाही. अखेर तिची कोणत्याही प्रकारे आबाळ होऊ नये म्हणून तिला बंगळुरूहून घेऊन आले. घेऊन येताना ते व त्यांच्या नोकरवर्गाने माझ्यावरच हल्ला करण्याचा प्रयत्न केला. आईला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला आहे, हे दुर्दैवी आहे.
चौकट
पोलीस संरक्षणाची मागणी
माझी दोन्ही मुले माझ्या घरात कोल्हापुरात सुरक्षित आहेत; पण जगन्नाथ पाटील यांनी मुलगी हरवल्याचे सांगत ५ लाखांचे बक्षीस जाहीर करणारा व्हायरल केलेला व्हिडिओ पाहून लोक माझ्या मुलांवर पाळत ठेवत आहेत. पैशाच्या हव्यासापायी त्याचे अपहरण झाले तर त्यांच्या जीविताला धोका असल्याने प्रगती पाटील यांनी पोलिसांकडे संरक्षण मागितल्याचे सांगितले. त्यांच्याकडून दगाफटका होण्याची भीती असल्याने रीतसर कारवाईची तक्रारही पोलिसांत देणार असल्याचे त्यांनी सांगितले.
चौकट
जगन्नाथ पाटील यांची गुन्हेगारी प्रवृत्ती
जगन्नाथ पाटील हे उच्च विद्याविभूषित असले तरी ते सुशिक्षित, सुसंस्कारी नाहीत. त्यांच्या पुरुषार्थामध्ये हिंसकता आहे. किरकोळ कारणावरून ते मला जबर मारहाण करीत होते. त्यांची स्त्रियांचा अवमान करणारी गुन्हेगारी प्रवृत्ती आहे, असा आरोपही प्रगती पाटील यांनी केला.