कोल्हापूर : किणी टोलनाक्यावर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांना करण्यात आलेली दुरूत्तरे आणि उपमुख्य लेखा वित्त अधिकारी राहुल कदम यांना धक्काबुक्की प्रकरणाची मंत्रालयातून दखल घेण्यात आली आहे. ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी मित्तल यांना बुधवारी सायंकाळी फोन करून चौकशी केली.मित्तल यांना दुरूत्तरे व कदम यांनाही धक्काबुक्की झाल्याचे पडसाद बुधवारी जिल्हा परिषदेत उमटले. सकाळपासूनच विविध शिक्षक संघटना, ग्रामसेवक संघटना, जिल्हा परिषदेच्या विविध कर्मचारी संघटना यांनी मित्तल यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला. या सर्वांनीच या प्रकाराचा निषेध करत तशी पत्रेही तयार करून आणली होती; मात्र मित्तल यांनी सर्वांचे आभार मानतानाच या प्रकाराचा निषेध करून, पत्रके काढून वाढवू नका, असे सांगितले.दिवसभर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांमध्ये या प्रकाराची चर्चा सुरू होती. दुपारच्या दरम्यान पोलिसांनीही येऊन मित्तल आणि राहुल कदम यांच्याकडून झाल्या प्रकाराची रितसर माहिती घेतली. सर्वच अधिकाऱ्यांनी यावेळी या टोलनाक्यावर शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना दादागिरी केली जात असल्याची तक्रार मित्तल यांच्याशी बोलताना व्यक्त केली.ठेकेदाराभोवतीचा फास आवळलाउच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी ओळखपत्र दाखविल्यानंतरही शेरेबाजी करून धक्काबुक्की केल्यानंतर आता जिल्हा परिषद, पोलिसांसह इतर शासकीय कार्यालयांनी या ठेकेदाराभोवतीचा फास आवळला आहे. दुपारीच हातकणंगले गटविकास अधिकाºयांनी कर्मचाºयांसह या नाक्याभोेवतीची ठेकेदाराने वापरण्यासाठी घेतलेली रिकामी जागा, बांधकामाचा फाळा भरला आहे का? याची माहिती घेतली. एकीकडे कामगार विभागाकडेही कर्मचाºयांबाबत तक्रार करण्यात आली असून, प्रॉव्हिडंड फंड विभागाकडेही तक्रार करण्यात आली आहे.मी वरिष्ठांशीबोलू का ?ग्रामविकास विभागाचे सचिव असीम गुप्ता यांनी झाल्या प्रकाराबद्दल माहिती घेऊन मी मुंबईच्या पातळीवर पोलीस अधिकाºयांशी बोलू का? अशी विचारणा मित्तल यांना केली. तेव्हा त्यांची गरज नसून स्थानिक पातळीवर जिल्हा पोलीसप्रमुखांनी कडक कारवाई केल्याचे मित्तल यांनी त्यांना सांगितले.पेरिडकर, भोजे यांच्याकडून निषेधदरम्यान, या प्रकाराचा जिल्हा परिषदेत बुधवारी झालेल्या बांधकाम समिती सभेत निषेध करून सभा तहकूब करण्यात आली. सभापती सर्जेराव पेरिडकर, सदस्य हंबीरराव पाटील, सरिता खोत, विजया पाटील, प्रसाद खोबरे, रोहिणी आबिटकर, सतीश पाटील, रसिका पाटील यांनी संबंधितांवर कारवाईचे निवेदन जिल्हाधिकाºयांना दिले. तसेच पक्षप्रतोद विजय भोजे यांनीही या प्रकाराचा निषेध केला आहे.ठेकेदारांवर कारवाई करावी : मित्तलयाबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल म्हणाले, टोलनाक्यावर आल्यानंतर आमची गाडी अडवली. आम्ही शासकीय अधिकारी आहोत, असे सांगूनही कर्मचारी ऐकत नव्हते. मी माझे कार्ड दाखविले तेव्हा हे कार्ड चालत नसल्याचे सांगण्यात आले. ‘असे अनेक अधिकारी आम्ही विकत घेतो’ अशा पद्धतीचे बोलणे ऐकल्यानंतर माझे सहकारी राहुल कदम हे त्यांना समजावत असताना त्यांना धक्काबुक्की करण्यात आली म्हणूनच रितसर पोलिसांत तक्रार दिली आणि अन्य शासकीय कार्यालयांमधून पुढील कारवाई होईल. आम्हाला ही वागणूक असेल, तर सर्वसामान्यांशी हे कसे वागत असतील. याला चाप लावण्यासाठी ठेकेदारावर कारवाईची आमची मागणी आहे.
मित्तल यांना अरेरावी; मंत्रालयातून दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:38 AM