कोल्हापूर : विधानसभा मतदारसंघातील जनतेची भूमिका तीच माझी आहे. मतदारसंघातील जनता हद्दवाढीच्या विरोधात आहे. हद्दवाढ झाल्यानंतर शेती धोक्यात येईल, अशी भीती त्यांना वाटते. म्हणून मला मतदारसंघातील जनतेसोबत राहावे लागते, असे म्हणत करवीर विधानसभा मतदारसंघातील शिंदेसेनेेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी हद्दवाढ समर्थनास गुरुवारी स्पष्ट शब्दांत नकार दिला.केएमटी, पाणी बंद करतो, अशाने प्रश्न सुटणार नाही. मी, दक्षिणचे आमदार अमल महाडिक, शहराचे आमदार राजेश क्षीरसागर एकत्र येऊन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक घेऊ, अशी समजूतही आमदार नरके यांनी शिष्टमंडळातील हद्दवाढीचे आक्रमकपणे समर्थन करणाऱ्यांची घातली.सर्वपक्षीय हद्दवाढ समर्थक कृती समितीचे शिष्टमंडळाने गुरुवारी शिवाजी पेठेतील आमदार नरके यांच्या घरी जाऊन भेट घेतली. माजी महापौर आर. के. पोवार यांनी ‘माझे हद्दवाढीला समर्थन आहे,’ असे पत्र द्या, अशी मागणी आमदार नरके यांच्याकडे मागणी केली. मात्र संपूर्ण बैठक होईपर्यंत आमदार नरके यांनी असे पत्र दिले नाही. उलट शहरातील अनेक लोक ग्रामीण भागात राहण्यासाठी जात आहेत, असे सांगून हद्दवाढविरोधावर संयतपणे ठाम राहिले.
आमदार नरके म्हणाले, हद्दवाढीला मी नरके म्हणून विरोध करीत नाही. माझ्या करवीर मतदारसंघातील लोकांची मानसिकता हद्दवाढविरोधी आहे. शहरालगतच्या ग्रामपंचायतींनी ग्रामसभेत हद्दवाढविरोधी ठराव केला आहे. त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून मी हद्दवाढविरोधी मत मांडत असतो. हद्दवाढीला विरोध आणि समर्थन असे दोन मतप्रवाह असल्याने मध्यममार्ग म्हणून प्राधिकरणाची स्थापना झाली. मी प्राधिकरणास दोन हजार कोटींचा निधी द्या आणि प्राधिकरणाच्या कार्यक्षेत्रातील गावांचा सर्वांगीण विकास करा, अशी मागणी शासनाकडे केली आहे.आर. के. पोवार म्हणाले, नगरपालिकेची महापालिका झाली त्यावेळी शिवाजी पेठेतून उठाव झाला होता. त्यामुळे शिवाजी पेठेत राहणारे आमदार नरके यांनी हद्दवाढीचे समर्थन करावे. हद्दवाढीला विरोध करणाऱ्या गावातील केएमटी बसची सेवा बंद करावी, अशी मागणी केली आहे. प्राधिकरणास विकास करण्यात यश आलेले नाही. तेथे केवळ दोन कर्मचारी असतात.ॲड. बाबा इंदूलकर म्हणाले, हद्दवाढ करायचीच नसेल तर तत्कालीन नगरविकास मंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेत येऊन बारा गावांचा हद्दवाढीचा प्रस्ताव का मागून घेतला. त्यांचा तो केवळ दिखावा होता का ? शहरात मनुष्याला राहण्यासाठी जागाच शिल्लक राहिलेली नाही. विकास खुंटला आहे. त्यामुळे हद्दवाढ झाली पाहिजे. यासाठी आमदार नरके यांनी समर्थन द्यावे.भाजपचे महेश जाधव, शिंदे सेनेेचे सुजित चव्हाण, किशोर घाटगे, बाबा पार्टे, अशोक भंडारे, दिलीप देसाई यांनी हद्दवाढ झालीच पाहिजे, असे स्पष्ट केले. बैठकीस वैशाली महाडिक, शुभांगी साखरे, सुनील देसाई, भरत काळे, सचिन भोळे, आदी उपस्थित होते.
त्यांनी अंगठ्या विकल्यामुुंबई, पुणे, नाशिक शहराची हद्दवाढ अनेक वेळा झाल्याने हद्दवाढीत आलेल्या गावातील शेतीला मोठी किंमत आली. अनेक शेतकऱ्यांच्या अंगावर शंभर तोळ्यांचे सोने आले, असे माजी महापौर पोवार यांनी सांगितले. यावर आमदार नरके यांनी शेतकऱ्यांची उपजीविका शेतीवरच असते. म्हणून आम्ही शेती विकू नका, असे सांगत असतो. ज्यांनी शेती विकून सोन्याच्या अंगठ्या घातल्या, त्यांनी आता त्या विकल्या आहेत, असे उत्तर दिले.
एकटे नाही.. तुमच्यासोबत येणार..!आमदार नरके यांनी आर. के. पोवार यांना तुम्ही हद्दवाढीस विरोध करणाऱ्या ग्रामस्थांशी संवाद साधा, असे सांगितले. यावर पोवार यांनी यापूर्वी आम्ही एका आमदारांच्या सांगण्यावरून एका गावात गेलो होतो. तिथे मारामारी होण्याची वेळ आली. त्यामुळे संवाद साधण्यासाठी आता तुम्ही आमच्यासोबत चला, असा आग्रह धरला.