कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील प्रत्येकाचे रेशनकार्ड असले पाहिजे व प्रत्येकाला धान्य मिळाले पाहिजे, यासाठी येत्या दोन महिन्यांत शहर पुरवठा विभागाच्या माध्यमातून विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती आमदार चंदकांत जाधव यांनी सोमवारी दिली. या मोहिमेंतर्गत ज्यांचे रेशनकार्ड नाही किंवा ज्यांना धान्य मिळत नाही, अशा प्रत्येक नागरिकाने संबंधित रास्त भाव धान्य दुकानात नोंदणी करावी, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले आहे.
कोल्हापूर शहरातील धान्य पुरवठ्याबाबतच्या सद्यस्थितीबद्दल शहर पुरवठा कार्यालयाचे अधिकारी व रेशन दुकानदार यांची आमदार जाधव यांनी बैठक घेतली, यावेळी ते बोलत होते. या बैठकीला शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे-जाधव उपस्थित होत्या.
आमदार जाधव म्हणाले, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यानुसार सवलतीच्या दराने हक्काचे धान्य मिळाले पाहिजे; मात्र धान्य मिळत नसल्याच्या अनेक कुटुंबांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यासोबत चर्चा केली असून, अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत कोल्हापूरसाठी इष्टांक वाढवून देण्याचे त्यांनी आश्वासन दिले आहे.
आमदार जाधव यांच्या शिफारसीने शहरातील सुमारे दोन हजार कुटुंबांना धान्य सुरू केल्याची माहिती शहर पुरवठा अधिकारी माधवी शिंदे यांनी दिली. आमदार जाधव यांच्या आवाहनानुसार शहरातील सर्व १६४ रेशन दुकानांमध्ये नवीन रेशनकार्ड नोंदणी व धान्य सुरु करण्यासाठी मोहीम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी पुरवठा निरीक्षक काशिनाथ पालकर, संजय गीते, सुरेश टिपुगडे, कोल्हापूर शहर रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष रवी मोरे, अशोक सोलापुरे, राजेश मंडलिक, आदी उपस्थित होते.
तृतीयपंथी, वेश्या महिलांसाठी...
शहरातील देवदासी, तृतीयपंथी व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांकडे रेशनकार्ड नसल्याच्या तक्रारी आहेत. त्यांच्यासाठी कोरोनाचा संसर्ग कमी आल्यानंतर विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आमदार जाधव यांनी सांगितले.