रत्नागिरी : लांजा येथील शिक्षिकेचे बदली प्रकरण पुन्हा एकदा गाजू लागले आहे. लांजा पंचायत समितीच्या सर्व सदस्यांनी या बदलीवरून मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा निषेध केलेला असतानाच आता या प्रकरणात आमदार राजन साळवी यांनीही उडी घेतली आहे. शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांसह आमदार साळवी सोमवारी जिल्हा परिषदेवर धडकले आणि दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना दिले.लांजा तालुक्यातील शिक्षिका सुषमा पाटोळे यांचे बदली प्रकरण सध्या जिल्हाभर गाजत आहे. समुपदेशनानंतर शिक्षिका बदलीच्या ठिकाणी रुजू झाली होती. मात्र, काही दिवसांतच त्या शिक्षिकेची बदली बागेश्री शाळेत करण्यात आली. त्यामुळे लांजा पंचायत समितीच्या सभेत जिल्हा परिषदेच्या निषेधाचा ठराव मांडण्यात आला. या बदलीप्रकरणी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीतही जोरदार चर्चा झाली होती. पंचायत समिती व स्थायी समितीच्या ठरावालाही जिल्हा परिषद प्रशासनाने जुमानलेले नाही. संबंधित शिक्षिकेने गटशिक्षणाधिकाऱ्यांनाही त्यांच्या केबीनमध्ये कोंडून ठेवले होते. तसेच पालकमंत्र्यांनीही त्या शिक्षिकेची बदली नियमित करावी, असे आदेश जिल्हा परिषदेला दिले होते. त्या आदेशालाही केराची टोपली दाखविण्यात आल्याने शिवसेनेमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. महिला व बालकल्याण समिती सभापतींच्या दालनात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची ग्रामस्थांबरोबर बैठक झाली. यावेळी लांजा सभापती लीला घडशी, जिल्हा परिषदेच्या सदस्या स्वरूपा साळवी, तालुकाप्रमुख संदीप दळवी, सदस्या दीपाली दळवी, लक्ष्मण मोर्ये, राजू कुरुप, गणेश लाखण यांच्यासह ग्रामस्थ व शिवसैनिक उपस्थित होते. सभापती घडशी यांनी त्या शिक्षिकेची बागेश्री शाळेवर नियुक्ती केल्याप्रकरणी जाब विचारण्यासाठी आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यावेळी आमदार साळवी यांनीही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना या प्रकरणावर तोडगा काढण्याचे आवाहन केले. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी एखाद्या शिक्षकाला कोणती शाळा द्यावी हे आपले काम नसल्याची भूमिका जाहीर केल्याने आमदारांसह सर्वांनीच संताप व्यक्त केला. त्यावेळी आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत त्या शिक्षिकेची तत्काळ बदली रद्द करा, अन्यथा पंचायत समितीला टाळे ठोकू, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिला. आमदार संतापल्याचे लक्षात येताच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांना तत्काळ दिले. तसेच त्या शिक्षिकेचा पती-पत्नी एकत्रिकरणाचा दाखला बोगस असेल तर त्याचीही चौकशी करण्यात येईल. तसेच समुपदेशनामध्ये दोष असेल तर ते रद्द करून पुन्हा घेण्यात येईल, असेही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी आमदारांसमोर स्पष्ट केले. मात्र, आमदार साळवी यांनी याप्रकरणी दोन दिवसांत निर्णय न घेतल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला. (शहर वार्ताहर)आजारी आमदार जिल्हा परिषदेतआमदार राजन साळवी यांच्यावर गेल्याच आठवड्यात अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, आजारी असतानाही सोमवारी ते अचानक जिल्हा परिषदेवर धडकल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती.बदलीमागे राजकीय वाद?त्या शिक्षिकेच्या बदलीवरून जोरदार राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्या शिक्षिकेला भाजपचा पाठिंबा असल्याची चर्चा सुरू असतानाच शिवसेनेने ग्रामस्थांच्या बाजूने उभा राहण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.आजारी आमदार जिल्हा परिषदेतआमदार राजन साळवी यांच्यावर गेल्याच आठवड्यात अँजिओप्लास्टी झाली आहे. त्यांना पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. मात्र, आजारी असतानाही सोमवारी ते अचानक जिल्हा परिषदेवर धडकल्याने प्रशासनाची धावपळ उडाली होती.
आमदार धडकले जिल्हा परिषदेवर
By admin | Published: August 23, 2016 1:01 AM