दत्तात्रय पाटील म्हाकवे : कागल तालुक्यात कोणत्या कारणावरून राजकीय वाद रंगेल याचा नेम नसतो. सध्या, विकास कामांच्या उद्घाटनावरुन वाद सुरू आहेत. म्हाकवे येथील महत्त्वाकांक्षी पाणी योजनेचे उद्घाटन राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ व भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले. त्यामुळे शुध्द पाण्याच्या म्हाकवेकरांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी नेमकं पाणी कोणी आणलं? यामध्ये श्रेय कोणाचं? याबाबत सुरू असणाऱ्या दावे-प्रतिदाव्यामुळे गावकरीच बुचकळ्यात पडले आहेत.येथील पिण्याच्या पाण्यासाठी तब्बल पाचहून अधिक योजना झाल्या. शासनाचे लाखो रुपये खर्च झाले. माञ, म्हाकवे येथील पाणी प्रश्नाचे ग्रहण काही सुटत नाही. शासनाने जनजीवन पाणी पुरवठा योजनेतून तब्बल ४ कोटी ८४ लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. एचडीपी पाईपसह फिल्टर हाऊस, टाकीही होणार आहे.दरम्यान, पेयजल मधून दहा वर्षापूर्वी झालेली सुमारे दीड कोटीची योजना कार्यरत असून ती केवळ खर्चासाठी तर नव्याने होणाऱ्या योजनेचे पाणी पिण्यासाठी वापरण्यात येणार आहे. माञ, सर्वच गल्लीतून पुन्हा खुदाई होणार असल्याने पुन्हा रस्त्यासाठी निधी आणावा लागणार आहे.चोर....घुसखोरया योजनेच्या उद्घाटन प्रसंगी आरोप प्रत्यारोपाच्याही फैरी झडल्या. विकास कामांची चोरी होत असल्याचा आरोप आमदार मुश्रीफांनी केला. तर याला प्रत्युत्तर देत समरजित घाटगेंनी घुसखोर असल्याचा आरोप केला.निधीच्या रकमेतही तफावतबसस्थानकावर दोन्ही बाजूंच्या कार्यकर्त्यांनी समोरासमोर फलक लावले आहेत. एकावर ४ कोटी ८४ लाख तर दुसऱ्या फलकावर ४ कोटी ९४ लाख असा उल्लेख आहे. त्यामुळे त्या दहा लाखांचे काय असा सवाल उपस्थित होत असून चर्चेचा विषय ठरला आहे.तालुक्यात अनेक गावात हीच स्थिती..हा निधी महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंजूर झाला असल्याचे आमदार मुश्रीफ यांचे म्हणणे आहे. तर ही केंद्राची योजना असून याच्या उद्घाटनाचा नैतिक अधिकार आम्हालाच असल्याचा दावा समरजित घाटगे यांच्याकडून होत आहे. कागल मतदार संघात अनेक गावांत या योजनेतून निधी मंजूर झाला आहे. त्यामूळे अनेक गावात श्रेयवाद उफाळण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
Kolhapur News: म्हाकवेत येणार शुध्द पाणी, पण आणले कोणी; श्रेयवादाचे राजकारण, निधीच्या रकमेत तफावत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2023 4:00 PM