कोल्हापूर : सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे सभासदत्व देतो, असे सांगून आमदार हसन मुश्रीफ यांनी प्रत्येकी दहा हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार ६७ शेतकऱ्यांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे केली. आमदार मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रारदारांचा ओघ वाढल्यामुळे एकूण १०८ तक्रार अर्ज आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेला प्राप्त झाले आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा आमदार हसन मुश्रीफ यांनी आर्थिक फसवणूक केल्याची फिर्याद मुरगुड पोलिस ठाण्यात दाखल आहे. त्यानुसार आमदार मुश्रीफ यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून, या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे सोपवण्यात आला आहे. यात आणखी ६७ तक्रारदारांनी आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन जबाब नोंदवण्याची विनंती केली.
शहाजी केशव पाटील (रा. लिंगनूर दुमाला, ता. कागल), मनोज चंदर गाडेकर आणि संतोष अशोक कोरवी (दोघे रा. कागल) यांनी निवेदन दिले. तक्रारदारांचे जबाब घेऊन पुढील चौकशी केली जात आहे, अशी माहिती आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी दिली.