कोल्हापूर: वेतननिश्चिती, भविष्यनिर्वाह निधीची रक्कम, वैद्यकीय बिले कामांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील अधिकारी, कर्मचारी पैसे घेतात अशा तक्रारी वाढल्या आहेत. ही अतिशय गंभीर बाब आहे. अशांवर कडक कारवाई करा अशी ताकीदच आमदार जयंत आसगावकर यांनी शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांना गुरूवारी दिली.अनेक माध्यमिक शिक्षकांनी आमदार आसगावकर यांच्याकडे याबाबत तक्रारी केल्या होत्या. त्यामुळे आसगावकर यांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनातच बैठक घेतली. यावेळी माजी आमदार भगवान साळुंखे यांच्यासह शिक्षक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.आसगावकर म्हणाले, जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात एजंटगिरीची चलती सुरू आहे. या एजंटांना अधिकारी वर्ग पाठीशी घालत आहेत. या एजंटाशिवाय बिले मंजूर होत नसल्याचे वास्तव आहे. एखाद्या शिक्षकाने चार वेळा बिले देऊनही त्यात त्रुटी निघत असतील, तर ती शिक्षण विभागासाठी लाजिरवाणी बाब म्हणावी लागेल.
शिक्षण विभागातील एजंटगिरी थांबवा, आमदार जयंत आसगावकर यांची शिक्षणाधिकाऱ्यांना ताकीद
By समीर देशपांडे | Published: March 14, 2024 5:55 PM