कोल्हापूर(प्रतिनिधी) : सलग चाळीस वर्ष काँग्रेसशी एकनिष्ठ राहूनही प्रदेश काँगसचे उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील सडोलीकर यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्याने कार्यकर्त्यांच्या असंतोषाचा उद्रेक झाला आहे. पुढील दिशा ठरवण्यासाठी उद्या बुधवारी सकाळी 11 वाजता फुलेवाडी येथे अमृत मल्टीपर्पज कार्यालयात कार्यकर्त्यांचा मेळावा बोलाविण्यात आला आहे.
पाटील यांनी पक्षाच्या अडचणीच्या काळात जिल्हाध्यक्षपदाची धुरा तब्बल वीस वर्ष सांभाळताना जिल्हयात पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले. सहापैकी चार विधानसभा निवडणुकांत पक्षातील काही नेल्यांनीच फंदफितुरी करून आ.पाटील यांचा निसटता पराभव घडवून आणला. तरीही पाटील यांनी संयम पाळला होता. 2004 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असतानाही मंत्रीपदापासून पाटील यांना वंचित ठेवण्यात आले होते.
माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचे देशातील पहिले स्मारक कोल्हापुरात उभारण्याबरोबरच त्यांच्या नावाने पहिली सुतगिरणी उभारली आहे. सलग सत्तावीस वर्ष राजीव गांधी सद्भावना दौडचे आयोजन करतात. अन्य पक्षातून आलेली आमंत्रणे ठोकरून गांधी नेहरू घराणे व काँग्रेसशी एकनिष्ठ राहिलेल्या पाटील यांचे यंदा मंत्रिपद हमखास मिळणार याची कार्यकर्त्याना खात्री होती. मात्र ऐन वेळेला पाटील यांना मंत्रींपदापासून डावलल्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यात असंतोषाचा उद्रेक झाला आहे. बहुतांशी कार्यकर्त्यानी सोशल मिडीयावरून पक्षाच्या निर्णयावर टीका करत पाटील यांनी आता पक्षाला रामराम ठोकावा असा दबाव आणला आहे. संतप्त कार्यकर्त्यानी बुधवारी फुलेवाडी येथील अमृत कार्यालयात तातडीचा मेळावा बोलावला आहे.
अनेक कार्यकर्त्यानी पक्षसंघटनेसह विविध पदांचे राजीनामे देण्याचा निर्धार केला आहे. या मेळाव्याला सर्वानी हजर रहावे, असे आवाहन गोकुळचे माजी अध्यक्ष व संचालक विश्वासराव पाटील, भोगावती साखर कारखान्याचे उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, करवीरच्या सभापती अश्वीनी धोत्रे, राधानगरी तालुका काँग्रेस अध्यक्ष हिंदुराव चौगले, करवीरचे अध्यक्ष शंकरराव पाटील, गोकुळचे संचालक पी डी धुंदरे, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, सत्यजित पाटील, राधानगरी तालुका काँग्रेस अध्यक्ष हिंदुराव चौगले, करवीरचे अध्यक्ष शंकरराव पाटील, राधानगरीचे उपसभापती उत्तम पाटील, भोगावती कारखान्याचे संचालक यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यानी केले आहे.