अतुल आंबीइचलकरंजी : आगामी सर्व निवडणुकांच्या पार्श्वभमूीवर आमदार प्रकाश आवाडे व माजी आमदार सुरेश हाळवणकर हे एकत्र येतील, अशी चर्चा सुरू आहे. त्याला मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा देत कार्यकर्त्यांना जुळवून घेण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर काही विषयांवर दोघांमध्ये मोबाईलवरून चर्चा होते. परंतु पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये एकत्र बैठक घेऊन नियोजन झाल्याचे दिसत नाही. गुरूवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया यांच्या दौऱ्यावेळी दोघे एकत्र दिसले. मात्र, त्यात अंतरही होते. त्यामुळे कार्यकर्ते अजूनही संभ्रमातच आहेत.भाजपला बिनशर्त पाठिंबा दिलेले आमदार आवाडे फक्त अधिकृत प्रवेश सोडला, तर सर्वत्र भाजप-भाजप करत आहेत. ते भाजपमध्ये कसे रूजणार? त्यांना सामावून घेतले जाणार का? त्यांचे हाळवणकर यांच्याशी सूत जुळणार का, असे अनेक सवाल इचलकरंजी मतदारसंघात वारंवार उपस्थित होत असतात. गुरुवारी केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया इचलकरंजी दौऱ्यावर होते. त्यांच्या स्वागताला आवाडे व हाळवणकर छत्रपती शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ थांबले होते.सुरुवातीला दोघांच्यात थोडे अंतर होते, त्यावेळी एका छायाचित्रकाराने त्यांचा फोटो काढला. हे लक्षात येताच आमदार आवाडे यांनी हाळवणकर यांच्याजवळ जाऊन आता घ्या फोटो, असे हसत म्हणाले. दोघे अंतर मिटल्याचे दाखवत असले तरी मनात थोडी खदखद असल्याचे दिसत होते. त्यानंतर दोघे एकत्र चालत वाहनाकडे निघाले. गाडीमध्येही दोघांमध्ये गोपीचंद पडळकर बसले होते. या सर्व प्रकाराची दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांमध्ये चर्चा रंगली होती तसेच आगामी जि.प., पं.स., महापालिका निवडणुकांमध्ये दोघांचा नेमका कोणता पवित्रा राहणार, याकडे लक्ष लागले आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही तेचइचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील तीन गावांमध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका होत्या. त्यामध्ये आवाडे-हाळवणकर यांनी काही प्रमाणात एकत्र नियोजन केले; परंतु संपूर्ण रणनीती ठरविताना दोघे एकत्र उपस्थित न राहता दोन्ही गटांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी यांच्याशी चर्चा करून त्यांच्या स्तरांवर नियोजन लावून दिले.