(आवाडे यांचा फोटो वापरावा)
विश्र्वास पाटील-लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : माजी मंत्री व इचलकरंजीचे अपक्ष आमदार प्रकाश आवाडे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या घडामोडी आहेत. त्यांना पक्षाने जिल्हाध्यक्षपद ऑफर केले आहे. या प्रवेशाबद्दल आवाडे यांना विचारणा केली असता त्यांनी फक्त सूचक हास्य केले आणि त्यांच्या ‘स्टाईल’ने हात जोडून अधिक बोलण्यास नकार दिला. गेली अनेक वर्षे हे घराणे काँग्रेस व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याशी जवळचे मानले जाते. सोमवारी काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनीही आवाडे यांची भेट घेतली परंतु भेटीनंतर पाटील यांनी पक्षप्रवेशाची चर्चा झाली नसल्याचे स्पष्ट केले.
आवाडे व खासदार गिरीश बापट यांचे दोन दिवसांपूर्वी पुण्यात बैठक झाली आहे. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही आवाडे यांची चर्चा झाल्याचे सूत्रांकडून समजले. आवाडे घराणाच्या आतापर्यंत राजकारण काँग्रेसच्या विचारधारेमध्ये गेले आहे. काँग्रेसने त्यांना सत्तेची पुरेपूर संधी दिली. त्यांचे आज जे साम्राज्य उभे आहे त्यामागे काँग्रेसचे बळ आहे. गतनिवडणुकीत इचलकरंजी मतदारसंघातून भाजपचे आमदार सुरेश हाळवणकर यांचा एकतर्फी पराभव करून आवाडे विजयी झाले. त्यानंतर त्यांनी भाजपला पाठिंबा दिला. सध्या ते आमदार असले तरी जिल्ह्याच्या राजकारणात मुख्य धारेपासून बाजूला पडले आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे कोल्हापूरचे असले तरी ते विधानसभेला कोथरूड मतदारसंघातून विजयी झाल्याने स्थानिक राजकीय घडामोडींकडे लक्ष द्यायला मर्यादा येत आहेत. महाडिक गट भाजपमध्ये सक्रिय आहे परंतु कोल्हापूरची जनता अजून त्यांच्यावर विश्वास ठेवायला तयार नाही. सध्याचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे हे चांगले काम करत असले तरी कागल विधानसभा हे त्यांचे मुख्य टार्गेट आहे. आता कोल्हापुरात महापालिकेची निवडणूक तोंडावर आहे तेथील पक्षापुढील आव्हान मोठे आहे. आवाडे यांच्याकडे जिल्हाध्यक्षपद देऊन या निवडणुकीत ताकदीने उतरायचे, अशी रणनीती त्यामागे आहे.
भाजपचे प्रेम कशातून..
आवाडे यांच्या राजकीय वाटचालीत यंत्रमाग व्यवसायाचे फार महत्त्व आहे आणि या उद्योगाला केंद्र सरकारचे पाठबळ असते. यंत्रमाग उद्योगाचा दीडशे कोटींचा मेगा क्लस्टरचा विषय किंवा त्यांच्या संस्थेला केंद्र सरकारकडून झालेली २५ कोटींची मदत या गोष्टीही त्याच्या मुळाशी आहेत.