दत्ता बिडकरहातकणंगले : हातकणंगले मतदारसंघात १६ उमेदवार असले तरी मुख्य लढत महाविकास आघाडीचे काँग्रेसचे आमदार राजू जयवंतराव आवळे, महायुती कडून जनसुराज्य पक्षाचे अशोकराव माने आणि परिवर्तन महाशक्ती चे स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून डॉ. सुजित मिणचेकर यांच्यातच सामना रंगणार आहे. जातीय समीकरणे आणि पक्षीय फुटाफुटीच्या राजकारणात सामान्य मतदार कोणाबरोबर राहणार यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.आमदार राजू आवळे हे गावागावामध्ये केलेल्या विकासकामांच्या जोरावर पुन्हा मैदानात उतरले आहेत. त्यांना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष व उद्धवसेनेचे बळ मिळत आहे. कट्टर शिवसैनिक काय भूमिका घेणार यावरच त्यांचा विजय अवलंबून आहे.महायुतीने जनसुराज्यचे अशोकराव माने यांना पुन्हा संधी दिली आहे. पराभूत झाल्या पासून त्यांनी गावागावात संपर्क ठेवून पद नसताना कोटयवधीची विकासकामे केली आहेत. भाजपा आणि शिंदेसेनेकडून त्यांना उमेदवारीची गळ घातली होती. मात्र जनसुराज्यचे प्रमुख आमदार विनय कोरे यांनी त्याची उमेदवारी घोषित केल्याने महायुतीच्या नेत्यांना त्यांना पाठिंबा देण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यांच्यामागे शिंदे सेनेचे खासदार धैर्यशिल माने, आमदार प्रकाश आवाडे आणि महाडिक गटाची ताकद आहे.महायुतीचे नेत आणि कार्यकर्ते किती एकसंघपणे काम करणार यावरच त्यांचे यश अवलंबून आहे.परिवर्तन महाशक्ती आघाडीचे उमेदवार माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमध्ये प्रवेश करून उमेदवारी घेतली. १० वर्षाच्या आमदारकीचा अनुभव आणि शिवसेना -भिमसेना संघटन जोडीला शेतकरी संघटना यामुळे त्यांनी निवडणूकीत चुरस निर्माण केली आहे. प्रमुख तिरंगी लढत असली तरी डॉ. क्रांती दिलीप सावंत ( वंचित बहुजन आघाडी )गणेश विलास वायकर (रिपलीकन पार्टी ऑफ इंडिया (अे ) अजित कुमार देवमोरे, अशोक तुकाराम माने, वैभव शंकर कांबळे, असे इतर तेरा प्रमुख उमेदवार कोणाची किती मते खाणार यावरच विजयाचे गणित ठरणार आहे.
काही बेरजी, काही वजाबाकी
२०१९च्या निवडणुकीत स्वाभिमानीचा पाठिंबा, आणि महाडिक गटाची ताकद काँग्रेस उमेदवाराला होता. यावेळी स्वाभिमानीचा उमेदवार रिंगणात आहे. तर महाडीक गट उघड जनसुराज्य बरोबर असल्याने कॉग्रेस उमेदवाराला ही तुट भरून काढावी लागणार आहे. पण यावेळी उद्धवसेना, राष्ट्रवादी राजू आवळेंसोबत असल्याने काँग्रेसची ताकद देखील वाढली आहे.जनसुराज्यला आवडेंची शक्ती२०१९ च्या निवडणूकीत आमदार प्रकाश आवाडे यांच्या ताराराणी पक्षाने स्वंतत्र उमेदवार दिला होता. या वेळी त्यांनी भाजपा मध्ये प्रवेश करून महायुतीला पाठिंबा दिला आहे. ही जनसुराज्य ची जमेची बाजू आहे.
- एकूण मतदान - ३४१६८५
- पुरुष - १७३४४९
- महिला - १६८२१६
- इतर - २०