VidhanSabha Election 2024: 'हात'कणंगलेत एकमेकाला साथ की बंडखोरीने करणार घात
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2024 04:34 PM2024-10-17T16:34:48+5:302024-10-17T16:35:30+5:30
आवळे, माने लागले कामाला, स्वाभिमानीही रिंगणात
आयुब मुल्ला
खोची : हातकणंगले विधानसभेसाठी महाविकास आघाडीकडून आमदार राजूबाबा आवळे (काँग्रेस), तर महायुतीकडून अशोकराव माने (जनसुराज्य- भाजप) यांची उमेदवारी पक्की मानली जाते. गेल्या वेळी दुसऱ्या क्रमांकावर राहिलेले डॉ. सुजित मिणचेकर हे उद्धवसेनेकडून उमेदवारीसाठी प्रयत्नशील आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने वैभव कांबळे यांना रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. महाविकास आणि महायुती यांच्यात जोरदार सामना होईल; परंतु मिणचेकर, कांबळे यांची उमेदवारी सगळ्यांचीच धावपळ उडविणारी ठरू शकते.
हातकणंगलेत राज्यातील नव्या घडामोडींमुळे राजकारणात समर्थक विरोधक, तर विरोधक समर्थक बनण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आमदार आवळे यांना तिकीट मिळणारच आहे तरीसुद्धा मिणचेकर यांनी शिवसेनेतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठी घेऊन उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू ठेवला आहे. त्यामुळे आघाडीत बिघाडीचे संकेत मिळत आहेत. लोकसभेला खासदार धैर्यशील माने यांना मताधिक्य मिळाल्याने शिंदेसेनेकडून अविनाश बनगे इच्छुक आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे दिसते. शेवटी हे प्रकार निवडणूक पूर्व असल्याने त्याची दखल वरिष्ठ किती घेतात, हे महत्त्वाचे आहे.
स्वाभिमानी गणित बिघडवणार
आवळे यांच्या पाठीशी आमदार सतेज पाटील यांची शक्ती आहे. आवळे कुटुंबाला अर्थात काँग्रेसला इथल्या मतदारांनी सतत पाठबळ दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)सोबत असून गतवेळी विरोधात असलेली उद्धवसेना यावेळी बरोबर असेल. विकासकामांच्या पाठबळावर आवळे यांनी गट तयार केला आहे. गतवेळी स्वाभिमानी संघटना सोबत होती. याचा फायदा आवळे यांना झाला होता. यावेळी संघटना स्वतंत्र उमेदवार देणार आहे. त्यामुळे काँग्रेसला इतर मतांची बेरीज करण्यासाठी धावपळ करावी लागणार आहे.
कागदावर महायुती प्रबळ
प्रकाश आवाडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. त्यांच्या ताराराणी पक्षाचे उमेदवार किरण कांबळे यांनी १९ हजारांहून अधिक मते गत निवडणुकीत घेतली होती. यावेळी त्यांची ताकद महायुतीला मिळणार आहे. त्यातच कोरे, माने, महाडिक, आवाडे, यड्रावकर, राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची ताकद अशोकराव माने यांच्या पाठीशी राहणार आहे.
२०१९ चा निकाल
- राजू जयवंतराव आवळे - ७३७२०,
- डॉ. सुजित मिणचेकर - ६६९५०
- अशोकराव माने - ४४५६२
सध्याचे मतदान
- एकूण मतदार - ३,३८,६३३.
- पुरुष- १,७२,१३९.
- महिला- १,६६,४७५.
- इतर -१९.