कोल्हापूर: एका जगप्रसिध्द रंग कंपनीने आपल्या रंगाच्या जाहिरातीत कोल्हापूरला हिणवल्याची तक्रार काँग्रेसचे आमदार ऋतुराज पाटील यांनी केली आहे. त्यांनी ही जाहिरात तातडीने मागे घेण्याची मागणी कंपनीकडे ट्विटद्वारे केली आहे. वृत्तवाहिन्यानीही या जाहिरातीचे प्रसारण करू नये असे ऋतूराज पाटील यांनी म्हटले आहे.
या जाहिरातीत त्या घरातील चिंटूचे तीन मित्र त्याच्या घरी येतात व तुझे घर किती चमकत आहे असे विचारतात. लाईट लावल्यावर तर ते घर अधिकच उजळून निघते. त्यावर चिंटूचे मित्र त्यास तुझे घर इतके चांगेल आहे तर तुमच्याकडे पैसेही भरपूर असतील अशी विचारणा करतात. त्यावर चिंटू होय भरपूर असून आम्ही यंदा सिंगापूरला जाणार असल्याचे मोठ्या आविर्भावात मित्रांना सांगतो. तेवढ्यात चिंटूचे वडिल येतात व ते रेल्वेचे तिकीट कन्फर्म झाले असून आपण कोल्हापूरला जाणार असल्याचे सांगतात. त्यावर चिंटू प्रश्र्नार्थक नजरेने कोल्हापूर अशी विचारणा करतो. त्यावर त्याचे मित्र हसत हसत कुचेष्टेने सिंगापूर असे सांगतात. त्यातून कोल्हापूरला हिणवल्याचे ऋतूराज पाटील यांचे म्हणणे आहे.
कोल्हापूर हे साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या अंबाबाईचे पूर्ण पीठ आहे. कोल्हापूर कला-साहित्य, क्रीडापासून ते शेती, सिंचन अशा अनेक क्षेत्रात देशात नावांजलेले शहर आहे. त्यामुळे सिंगापूर इतकेच कोल्हापूरचेही महत्व आहे. राजर्षी शाहू महाराजांनी घडवलेल्या कोल्हापूरची कुणी चेष्टा करू नये, ती खपवून घेणार नाही असे ऋतूराज पाटील यांनी म्हटले आहे.