काँग्रेस निवडणूक समितीत सतेज पाटील यांना संधी
By विश्वास पाटील | Published: April 12, 2023 06:44 PM2023-04-12T18:44:53+5:302023-04-12T18:45:19+5:30
निवडणूक कोणतेही असो, त्यात उतरायचे तर ती जिंकण्याच्या इराद्यानेच! अशी त्यांची आजपर्यंतची वाटचाल
कोल्हापूर : राज्यात आगामी काळात होत असलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीने निवडणूक समन्वय समितीची स्थापना केली असून, त्यामध्ये विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांना पक्षाने स्थान दिले आहे.
एकूण १७ सदस्यांच्या या समितीचे अध्यक्ष काँग्रेस प्रातांध्यक्ष नाना पटोले आहेत. अन्य सदस्यांमध्ये विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण यांचा सहभाग आहे. समन्वय समितीत माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, यशोमती ठाकूर, प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान, बसवराज पाटील, आमदार प्रणिती शिंदे, आमदार कुणाल पाटील, प्रदेश कोषाध्यक्ष अमरजित मनहास, प्रदेश मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष संध्या सव्वालाखे, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार व प्रमोद मोरे यांचा समावेश आहे.
आमदार सतेज पाटील हे काँग्रेसचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष असून, त्यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसचे सध्या सहा आमदार आहेत. निवडणूक कोणतेही असो, त्यात उतरायचे तर ती जिंकण्याच्या इराद्यानेच! अशी त्यांची आजपर्यंतची वाटचाल आहे. कोल्हापूर उत्तरच्या पोटनिवडणुकीत गतवर्षी त्यांच्यातील निवडणूक कौशल्याचा व राजकीय मुत्सद्देगिरीचा प्रत्यय राज्याला आला होता. भाजपची तगडी यंत्रणा विरोधात असतानाही त्यांनी ही निवडणूक अंगावर घेतली व जिंकून दाखवली.
लोकसभेच्या २०१९च्या निवडणुकीतही त्यांनी आमचं ठरलंय, ही टॅगलाइन घेऊन शिवसेनेच्या संजय मंडलिक यांना विजयी करण्यात मोठी भूमिका बजावली. लोकसभा, विधानसभा, गोकूळ दूध संघ असो की विधानपरिषदेची निवडणूक, त्यांनी ज्या निवडणुकीत भाग घेतला तिथे यश मिळवले आहे. त्यांच्यातील या निवडणूक व्यवस्थापनाचा पक्षाला लाभ व्हावा, यासाठी त्यांना या समितीत स्थान दिले आहे.