कोल्हापूर : शिवसेनेचे सचिव, खासदार विनायक राऊत यांनी काल, शुक्रवारी कोल्हापुरात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात राजेश क्षीरसागर यांच्यावर सडकून टीका केली होती. यावेळी राऊतांनी क्षीरसागरांनी मला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना जेवायला बोलावले होते त्याचे पैसे मात्र सतेज पाटील यांच्याकडून घेतल्याचा गौप्यस्फोट केला होता. राऊतांच्या या टीकेनंतर माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली.राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी घरी ठेवलेल्या जेवणासाठी आम्हा सगळ्यांना आमंत्रण दिले होते. त्यांच्या घरच्या जेवणाचे बील मी कसं भागवणार? असं असतं तर मी माझ्याच घरी जेवण दिले असते. राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवरची टिका होणे संयुक्तीक नाही, हा शिवसेनेचा अंतर्गत मुद्दा आहे असे स्पष्टोक्ती सतेज पाटील यांनी दिली.सतेज पाटील म्हणाले, हा राजकीय आरोप असू शकतो. राजेश क्षीरसागर आणि नाना पटोले यांनी विधीमंडळात एकत्र काम केले आहे, क्षीरसागर यांनी घरी जेवण ठेवले होते आणि आम्हाला सगळ्यांना जेवणाचे आमंत्रण दिले होते. मी फक्त जेवायला गेलो होतो. त्यामुळे त्यांच्या घरच्या जेवणाचे बील मी देण्याचा काही संबंध नाही. हे करायचं असतं तर मी माझ्या घरी जेवण दिलं असतं. राजकारणात एवढ्या खालच्या पातळीवरची टिका होणे योग्य नसल्याचेही मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं.
राजेश क्षीरसागरांनी घरी दिलेल्या जेवणाचे बील मी कसं भागवणार? - सतेज पाटील
By भारत चव्हाण | Published: July 16, 2022 2:09 PM